शिंदे गटाच्या खासदारांचा जायकवाडीला पाणी सोडण्यास विरोध; ऐन दिवाळीत पाणीप्रश्न पेटणार
Ahmednagar News: नगर नाशिकवर अन्याय करणारा निर्णयावर सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्र येवून यासाठी लढा देण्याची गरज असल्याचं खासदार सदाशिव लोखंडे यांनी म्हंटले.
अहमदनगर: अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यातील धरणातून जायकवाडी धरणात पाणी सोडण्याच्या निर्णयावर नेत्यांसह शेतकरी आक्रमक झाले आहेत. पाणी जर सोडले तर नगर नाशिकमधील शेतकरी उध्वस्त होणार असल्याचे शिंदे गटाचे शिर्डीचे खासदार सदाशिव लोखंडे यांनी म्हटले असून पाणी सोडण्यास त्यांनी विरोध केला आहे.
एकीकडे निळवंडे धरणातून दुष्काळग्रस्त भागात सोडलेले पाणी अनेक गावात पोहचलेच नाही. त्यामुळे संतप्त झालेले शेतकरी जायकवाडीला पाणी सोडणार असल्याने हवालदिल झाले आहेत. आज खासदार सदाशिव लोखंडे यांनी शिर्डीत बैठक घेतली आणि पाणी सोडण्याच्या निर्णयाला विरोध दर्शविला आहे.
2005 साली झालेला काळा कायदा आज नगर नाशिकवर अन्याय करणारा असून इथल्या सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्र येवून यासाठी लढा देण्याची गरज असल्याचं खासदार सदाशिव लोखंडे यांनी म्हंटले आहे. हा प्रश्न कायमचा सोडवायचा असेल तर पश्चिमेकडे वाहून जाणारे पाणी गोदावरी खोर्यात वळवण्याची गरज असल्याचंही त्यांनी म्हंटले आहे.
दरम्यान शिवसेनेचे नेते आणि आमदार संजय शिरसाट यांनी उडी घेतली असून रस्त्यावर उतरण्याचा तसेच न्यायालयात जाण्याचा इशारा दिला आहे.
मराठवाड्यातील पाणी प्रश्नावर लक्ष केंद्रीत करताना शिवसेनेचे नेते आणि आमदार संजय शिरसाट चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. ते म्हणाले, मराठवाड्याला पाणी मिळाले पाहिजे ही आमची मागणी आहे. न्यायालयाने देखील आदेश दिला आहे, पण काही लोकांचा याला विरोध आहे. या लोकांना संजय शिरसाट यांनी इशारा दिला आहे. तर आमच्या हक्काचं आणि न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार पाणी द्यावे, अशी विनंती करत यासाठी आम्ही देखील न्यायालयात जाणार असून, वकिलांची फौजी उभी करणार आहोत.
आम्हाला आता लढा उभा करावा लागणार आहे, पाण्यासाठी आडवे येत असलेल्यांना हा इशारा असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तर नवीन धरण बनवू नयेत अशी आमची मागणी सांगत आता आम्ही रस्त्यावर उतरणार आहे. आम्हाला रस्त्यावर उतरवावे लागले तरीही मागे पुढं पाहणार नाही, असा इशारा सरकारला दिला आहे.
Web Title: Shinde group MPs oppose release of water to Jayakwadi
See also: Latest Marathi News, Sangamner News, Ahmednagar News, Education Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App