सेक्सटॉर्शन कॉल अन् शिक्षकाने अटल सेतूवरून घेतली उडी
Teacher attempt to Suicide: सेक्सटॉर्शनमुळे एका शिक्षकाने अटल सेतूवरून उडी मारल्याची धक्कादायक घटना.
मुंबई: सेक्सटॉर्शनमुळे एका शिक्षकाने अटल सेतूवरून उडी मारल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. वैभव इंगळे ( वय-५०) असे सदर शिक्षकाचे नाव आहे. शुक्रवारी सकाळी ९ वाजताच्या सुमारास त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले आहे. वैभव हे अलिबाग तालुक्यातील शिवाजीनगर कुर्डुस येथील रहिवासी होते.
याबाबत अधिक माहिती अशी की, वैभव हे सकाळी साडेसात वाजता कुटुंबाला जास्त काही माहिती न देता घराबाहेर पडले. मोबाईल फोन घरीच सोडून ते चिरनेरमार्गे अटल सेतू पुलापर्यंत गेले. पुढे जवळजवळ ९ किलोमीटर गाडी चालवल्यानंतर त्यांनी गाडी पार्क केली आणि लगेचच पुलावरून उडी मारली. सीसीटीव्ही कॅमेऱ्यात गाडी पार्क केल्याची घटना कैद झाली आहे.
दरम्यान पोलिसांना घटनेची माहिती मिळताच तातडीने ते दाखल झाले आहेत. दरम्यान आता वैभव यांचा शोध घेतला जात आहे. वैभव यांनी सेक्सटॉर्शनमुळे हे टोकाचे पाऊल उचलल्याचं सांगण्यात येत आहे. ते पनवेल तालुक्यातील कुर्डुस गावातील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक होते. समाजात बदनामीची भीती असल्याने त्यांनी हा टोकाचा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे. याबाबत पोलीस अधिक तपास करीत आहे.
Web Title: Sextortion call and the teacher jumped from Atal Setu attempt to suicide