अहिल्यानगर: घरासमोर खेळणाऱ्या सात वर्षीय बालकाचा कारच्या धडकेत मृत्यू
Breaking News | Ahilyanagar Accident: घरासमोर खेळत असलेल्या सात वर्षाच्या बालकाचा भरधाव वेगातील कारची जोरात धडक बसून जागीच मृत्यू.
अहिल्यानगर | केडगाव :घरासमोर खेळत असलेल्या सात वर्षाच्या बालकाचा भरधाव वेगातील कारची जोरात धडक बसून जागीच मृत्यू झाला. पोखर्डी (ता. अहिल्यानगर) येथे पिंपळगाव उज्जैनी जाणाऱ्या रस्त्यालगत शुक्रवारी (८ ऑगस्ट) सायंकाळी ५:३० वाजेच्या सुमारास ही घटना घडली. अथर्व नंदू सुसे (वय ७, रा. पोखर्डी) असे मृत बालकाचे नाव आहे.
याबाबत राजेंद्र भाऊराव सुसे (वय ४१, रा. पोखर्डी) यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. फिर्यादीनुसार, राजेंद्र सुसे यांचा पुतण्या अथर्व हा घरासमोर असलेल्या गणपती मंदिराजवळ खेळत होता. त्यावेळी पोखर्डी ते पिंपळगाव उज्जैनी रोडने भरधाव वेगात जाणाऱ्या कारवरील (एमएच १६, बीएच २२७१) चालकाचा ताबा सुटल्याने कारची अथर्वला मागून जोरात धडक बसली. धडकेनंतर कारचालक पोपट कुंडलिक वाघ (रा. पिंपळगाव उज्जैनी) हा घटनास्थळावरून पसार झाला. या धडकेत अथर्वचा जागीच मृत्यू झाला. नागरिकांनी अथर्व यास त्वरित जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले, परंतु डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले.
याबाबत राजेंद्र सुसे यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलिसांनी कारचालक पोपट वाघ याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस हवालदार पालवे करीत आहेत.
Breaking News: Seven-year-old boy dies after being hit by car while playing in front of house