संगमनेर: अज्ञातांनी दुकानाला लावली आग, रोख रकमेसह साहित्य जळून खाक
Breaking News | Sangamner: तरूणाच्या मेडिकल व हार्डवेअरच्या दुकानाला अज्ञात चोरट्यांनी आग (Fire) लावल्याची घटना.
संगमनेर: तालुक्यातील नांदुरी दुमाला येथील महेश शांताराम शेटे या तरूणाच्या मेडिकल व हार्डवेअरच्या दुकानाला अज्ञात चोरट्यांनी आग लावल्याची घटना सोमवारी (दि.17) पहाटे घडली आहे. या आगीत रोख रक्कम, औषधे, शेतीचे साहित्य जळून खाक झाले आहे. यामुळे त्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी, की नांदुरी दुमाला येथे महेश शेटे या तरूणाचे साई मेडिकल अँड जनरल स्टोअर्स व साई ट्रेडिंग कंपनी नावाने दुकान आहे. नेहमीप्रमाणे ते मेडिकल व दुकान बंद करून घरी गेले होते. सोमवारी पहाटेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी दरवाजाचा कडी-कोयंडा तोडून आत प्रवेश केला. यानंतर दुकानातील सामानाची उचकापाचक करून नुकसान केले. यानंतर काही रोख रक्कम देखील चोरून नेली आहे. यानंतर दुकानाला आग लावून दिली. यामुळे दुकानातील तीस हजार रुपयांच्या नोटा अर्धवट अवस्थेत जळाल्या आहेत.
याचबरोबर मेडिकलमधील फ्रीज, गोळ्या औषधे तर साई ट्रेडिंग कंपनीमधील शेतीला लागणारे सर्व साहित्य जळून खाक झाले आहे. यामुळे शेटे यांचे मोठे नुकसान झाले आहे. याबाबत तालुका पोलिसांना माहिती समजताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी करून पंचनामा केला आहे. याप्रकरणी महेश शेटे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन तालुका पोलिसांनी अज्ञात इसमाविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्सटेबल अमित महाजन हे करत आहे. दरम्यान आगीची तीव्रता एवढी होती की अक्षरशः साहित्याचा कोळसा झाला आहे.
Web Title: set fire to the shop, burnt the material along with cash