संगमनेर: पेट्रोल पंपावर पिस्तुलाचा धाक दाखवून दरोडा
Sangamner News: तीन दरोडेखोरांनी पेट्रोल पंपावर पिस्तुलाचा धाक दाखवून लुटल्याची (robbery) घटना साकुर मांडवा रोडवरील भगवान पेट्रोल पंपावर घडली.
संगमनेर: संगमनेर तालुक्यातून धक्कादायक घटना समोर आली आहे. तीन दरोडेखोरांनी पेट्रोल पंपावर पिस्तुलाचा धाक दाखवून लुटल्याची घटना साकुर मांडवा रोडवरील भगवान पेट्रोल पंपावर घडली आहे. संगमनेर तालुक्यातील साकुर येथील साकूर-मांडवा रोडवरील भगवान पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्याचा बहाना करून आलेल्या अज्ञात तीन दरोडेखोरांनी पेट्रोल पंपावरील कर्मचार्यास पिस्तुलाचा धाक दाखवुन 2 लाख 50 हजार 747 रोख रक्कम चोरून नेल्याची धक्कादायक घटना रविवार दि. 26 फेब्रुवारी रोजी रात्री पावणेदहा वाजण्याच्या सुमारास घडली. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेर्यात कैद झाला असून परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
साकूर-मांडवे रोडवर भगवान पेट्रोल पंपावर रविवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास तोंडाला रुमाल बांधलेले 3 अज्ञात दरोडेखोर मोटरसायकलमध्ये पेट्रोल भरण्याच्या बहाण्यावरून पंपावर आले होते. त्यावेळी पंपावरील कर्मचारी विलास भाऊसाहेब कातोरे हा पेट्रोल भरण्यासाठी पंपाकडे जात असताना ते तिघे अज्ञात दरोडेखोर केबिनमध्ये घुसले आणि केबिनमध्ये पैसे मोजत असणारा कर्मचारी सुनील गीरे यास एकाने पिस्तुलाचा धाक दाखवत तुझ्याकडे असणारे सर्व पैसे आम्हाला दे नाही, तर गोळी घालून मारून टाकण्याची धमकी दिली.
तर दुसर्याने त्याच्या हातातील पैसे हिसकावून घेतले, तर तिसर्याने ड्राव्हरमध्ये असलेली काळ्या रंगाची बॅग काढून त्यातील पैसे काढून घेतले आणि मांडवे गावच्या दिशेने पळून गेले. पंपावरील कर्मचारी चोर चोर असे मोठ्याने ओरडल्यामुळे आसपासचे नागरिक पंपाकडे धावले, तर गिरे यांनी या घटनेची माहिती पंपाचे मालक आदिक खेमनर आणि मॅनेजर दत्ता शेंडगे यांना दिली. त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पेट्रोल पंपावरील कर्मचारी सुनील गीरे यांनी घारगाव पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात तीन चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
Web Title: Sangamner Robbery at the petrol pump
See Latest Marathi News, Ahmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App