संगमनेर: प्रेमाच्या जाळ्यात अडकले माकड, माकडाची दहशत
Sangamnes Trapped News: वनविभागाने माकडीणला आणत तिच्या आमिषाने माकडाला केले जेरबंद.
संगमनेर: संगमनेर तालुक्यातील साकुर गावात एका माकडाने काही दिवसांपासून चांगलीच दहशत घातली होती. त्याने एक-दोन नव्हे तर तब्बल 25 जणांहून अधिक जणांवर हल्ला केला. शर्थीच्या प्रयत्नानंतर या माकडाला जेरबंद करण्यात वनविभागाला यश आलं आहे. विशेष म्हणजे यावेळी वनविभागाने एका माकडीनीला आणत तिच्या आमिषाने माकडाला जेरबंद केले आहे.
अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील साकूर गावात एका माकडाने काही दिवसांपासून दहशत माजवली होती. तसेच बालके व ग्रामस्थांवर थेट हल्ले करत चावा घेत असल्याने घबराट पसरली होती. बुधवारी सायंकाळी साकुर येथील दोन मुलींवर माकडाने हल्ला करत चावा घेत गंभीर जखमी केले होते. जवळपास २७ व्यक्तींना माकडाने चावा घेत जखमी केल्याची माहिती आहे. माकडाच्या या दहशतीने साकुरकर हैराण झाले होते.
वनविभागाला अनेक प्रयत्न करून यश येत नसल्याने अखेर वन अधिकाऱ्यांनी अनोखी शक्कल लढवत या माकडासाठी प्रेमाचा सापळा रचला आणि या सापळ्यात हे माकड जेरबंद करण्यात वनविभागाला यश आलं आहे.
नागरिकांवर हल्ला करणाऱ्या या माकडाला पकडण्यासाठी बऱ्याच दिवसांपासून साकूर गावात वनखात्याची रेस्क्यु टीम तळ ठोकून होती. परंतु हे माकड कुणाच्याही हाती लागत नव्हतं त्यासाठी किमान चार पिंजरे वेगवेगळ्या ठिकाणी लावले, तरीही अद्याप हे माकड पकडण्यात यश आलं नाही. अखेर साकुर गावाजवळून जाणाऱ्या तासकरवाडी रस्त्याला एक शिवारात हे माकड असलायचं समजताच एका माकडीनीला त्या परिसरात आणण्यात आलं आणि संबधित माकड त्या माकडीनीच्या अमिषापोटी त्याठिकाणी पोहचलं. ज्यानंतर रेस्क्यू ऑपरेशन सुरू झालं.
रेस्क्यू ऑपरेशन सुरू झाल्यानंतर बराच वेळ माकड त्याठिकाणी थांबल्याने त्याला वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी लांबून इंजेक्शन देत बेशुद्ध करण्याचा प्रयत्न केला. पण इंजेक्शन टोचताच माकडाने तिथून जवळ असणाऱ्या ओढ्याजवळ धूम ठोकली. मात्र इंजेक्शन लागल्याने वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी त्याच्या मागे धाव घेत त्याला जाळी टाकून रेस्क्यू करण्यात यश मिळवलं. माकड जेरबंद झाल्याने गावकऱ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.
Web Title: Sangamner monkey trapped in love