संगमनेर | Boilpola: आजचा हा फोटो अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील सह्याद्रीच्या कुशीत उगम पावणाऱ्या प्रवरा नदीच्या तीरावर जोर्वे गावातील “थोरात वस्ती” वरचा आहे. त्यात माझे मोठे बंधू व राज्याचे महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात व सौ.कांचन वहिनी आणि डॉ. जयश्री आहे. आजचा फोटो बघून मला लहानपणी चा पोळा आठवला. 50 वर्षापूर्वी वस्तीवर डझनभर बैल असायचे. बैलाच्या जीवावर शेती पिकायची. पोळा सण येणार म्हणजे वस्तीवर, गावात, बाजारात सगळी तयारी सुरू व्हायची. गावात अंबाडयाचे दोरखंड तयार करायला सुरुवात व्हायची. बाजार रंगीबेरंगी गळ्यातील पट्टे, बैलांच्या पाठीवरचे वस्त्र (झुले) यांनी सजायचे. कुंभारआळ्यात मातीचे सुंदर बैल तयार करत. पोळ्याचा आठवडे बाजार म्हणजे खास भरायचा.
आम्ही वस्ती वरचे सर्व भावंडे पोळ्याच्या सणाची वाट बघायचो. पोळ्याच्या दिवशी घरातील स्त्रियांना खूप काम असे. त्या संपूर्ण भले मोठे अंगण सुंदर सारवून काढत. त्याकाळी रांगोळीची पूड विकत मिळत नसे. नदीवरून रांगोळीच्या गारगोट्या (शिरगुळे) पांढऱ्या रंगाच्या आणून त्या विस्तवावर भाजून खलबत्त्यात कुटून चाळत असे. ती तयारी आधीच महिन्यावर करून ठेवत.
सारवलेल्या अंगणात माझ्या आत्या, बहिणी भलीमोठी सुंदर रांगोळी काढत. रांगोळीत सजवलेली बैलजोडी माझी आई डोक्यावर पदर घेतलेली व सुपातून पुरणपोळी धान्य खायला देते अशी हुबेहूब रांगोळी त्या काढत.
आम्ही मुले गावातून येणाऱ्या कुंभार मामाची वाट पाहायचो. ते घरोघरी 5 – 5 बैल देत. प्रत्येक जण आमच्यासाठी वेगळे मातीचे सुंदर बैल – हत्ती – घोडे देत. त्यांना आम्ही गहू देत. कोन आधी बैल घेते यासाठी सर्व पळापळ व्हायची. माळी, झेंडूची फुले पूजेसाठी घेऊन यायचे. तांबोळी मामा खायचे पान घेऊन यायचे. ज्या बैलांना रंग नाही. त्या बैलांना आम्ही ‘घेरू’ रंग द्यायचो.
माझी आई – काकी सर्वजणी पन्नास-साठ लोकांसाठी चुलीवर पुरणपोळी बनवत. वस्ती वरचे सर्व कामगार, कुटुंब पोळ्याला आलेले शहरातील पाहुणे यांना मोठा पाहुणचार असे. बैलांच्या शिंगात गव्हाच्या पिठाचे गोल – गोल शेंगोळे बनवून ते मातीच्या बैलांच्या शिंगात घालत. बैलांच्या पूजेसाठी ताटे तयार करून ठेवत. बैलांना मोठ्या पुरणपोळ्यांचा नैवद्य करत. सुपात बाजरी भरून ठेवत. त्यांचे पाय धुवायला तांब्याचा घडवा भरून ठेवत. इकडे वस्तीवरची मोठी माणसे माझे वडील ति. भाऊसाहेब थोरात ( दादा ), तात्या, नाना सर्वजण उत्साहत असत. ते बैलांना अंघोळ घालून त्यांना सुंदर रंगी – बेरंगी डिझाईन, ठिपके काढून रंगवत. त्यांच्या गळ्यात घंटा ( घोगर माळ )बांधत. त्यांचे जुने दोर काढून नवीन लावत. शिंगांना ‘छंबी ‘घालत व त्याला रंगीबिरंगी गोंडे बांधत. सर्वजण ठेवणीतले नवे कपडे घालत व पाच वाजता बैलांना देवदर्शनाला नेत. बऱ्याच ठिकाणी बँड लावून नेत असत. बैल देव दर्शनाला गेले की वस्तीवरची सर्व नवीन कपड्यात ज्यांचे बैल पहिले येतील त्यांच्या दारापुढे पूजेसाठी येत.
घरातील महिला नऊवार साडी, नथ घालून पूजेचे ताट, नैवद्य धान्याचे सूप, तांब्याचा गडवा घेऊन बैलाची वाट बघत. बैल येताच पूजा होई. बैल शांतपणे पूजा करून घेत. पूजा होताच सर्वांना पढवी मध्ये पुरुषांना जेवणाचे ताटे केली जात. सुंदर चवदार सार भात, भजी, कुरडई, पुरणपोळी, दूध, तूप असे जेवणावळी होई. पुरणाच्या पोळ्या बारा बलुतेदारांसाठी पाटीभर तयार ठेवत व त्यांना त्या देत असत.
असा हा पोळा सण आज आठवणीत असणारा आहे.
सौ.दुर्गा सुधीर तांबे, नगराध्यक्ष, संगमनेर नगर परिषद ,संगमनेर
Web Title: Sangamner Jorve boilpola