संगमनेर तालुक्यातील घटना: चालकाने थेट पोलीस निरीक्षकाच्या अंगावर घातली कार

घारगाव | Sangamner: कोरोना प्रादुर्भाव पार्शभूमीवर जिल्हा बंदी लागू करण्यात आलेली असल्याने संगमनेर तालुक्यातून जाणाऱ्या नाशिक पुणे महामार्गावर आंबी खालसा फाटा येथे शनिवारी सायंकाळी साडे सात वाजेच्या सुमारास पोलीस वाहनांची तपासणी करत होते. यावेळी नाशिकहून पुणेकडे कार घेऊन जाणाऱ्या चालकाने थेट पोलीस निरीक्षकाच्या अंगावर कार घातल्याची घटना घडली आहे. या घटनेत सुदैवाने ते बचावले. मात्र कारचे चाक पायावरून गेल्याने त्यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे.
सुनील पाटील असे या जखमी झालेल्या पोलीस निरीक्षकाचे नाव आहे. त्यांच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहे.
याबाबत माहिती अशी की, संचारबंदी सुरु असल्यामुळे नाशिक पुणे महामार्गावर आंबी खालसा शिवारात घारगाव पोलिसांनी नेहमीप्रमाणे शनिवारी नाकाबंदी केली. सायंकाळी साडे सात वाजेच्या सुमारास नाशिकहून आलेली कार (एम.एच.१२ आर. वाय. ८५६८) पुण्याच्या दिशेने जात होती. पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांनी कार थांबविण्यासाठी इशारा केला मात्र कार चालकाने थेट पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांच्या अंगावर घातली. यामध्ये पाटील यांच्या डाव्या पायाच्या पंजावरून कारचे चाक गेल्याने त्यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहे. पोलिसांनी कार चालकास ताब्यात घेतले आहे. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.
Web Title: Sangamner driver drove the car directly over the police inspector
















































