अहमदनगर: वाळू तस्करांचा तलाठ्यावर हल्ला, जप्त केलेले वाहन पळवून नेले
Ahmednagar News: महसूल पथकातील तलाठ्यास काठीने जबर मारहाण करून वाळू तस्करांनी जप्त केलेले वाहन पळवून नेले.
कोपरगाव : महसूल पथकातील तलाठ्यास काठीने जबर मारहाण करून वाळू तस्करांनी जप्त केलेले वाहन पळवून नेले. तालुक्यातील जेऊरकुंभारी येथे गुरुवारी (दि.९) पहाटे ६ च्या सुमारास घडलेल्या या घटनेने तालुक्यात खळबळ उडाली आहे. राजू शेखसह अन्य ४ तस्करांचा यामध्ये समावेश आहे.
तालुक्यातील जेऊर कुंभारी येथे अवैध वाळू वाहतूक करणारा डंपर पकडून कारवाईसाठी तहसील कार्यालयात नेत असताना वाळू तस्करांनी रस्त्यात डंपर अडवून तलाठी प्रवीण शेषराव डहाके यांना मारहाण करून डंपर पळवून नेला. तलाठी डहाके यांनी आरोपी राजू शेख उर्फ राजा महंमद शेख सह इतर तीन अनोळखी इसमांविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. ही घटना गुरुवारी सकाळी सहा वाजता घडली.
वाळू तस्करांनी तालुक्यात पुन्हा थैमान घातल्याने तहसीलदार संदीपकुमार भोसले यांनी त्याची गंभीर दखल घेतली. देर्डे फाटा येथे गोदावरी नदीपात्रातून अवैधरित्या वाळूचा उपसा करून, चोरटी वाहतूक होत असल्याची खबर त्यांना मिळाली. त्यानंतर गुरूवारी पहाटे ४ वाजता महसूल पथक घटनास्थळी धडकले. तेथे त्यांना वाळू भरलेला विना क्रमांकाचा डंपर आढळला. पथकाने चालकाकडे परवान्याची विचारणा केली असता, उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर वाळूचे वाहन तलाठी प्रवीण डहाके व इंगळे यांनी जप्त केले.
त्याच्यावर कारवाई करून तो डंपर तहसील कार्यालयात घेऊन जात असताना जेऊर कुंभारी शिवारात एका चारचाकी गाडीतून आरोपी राजू शेख व इतरांनी डंपर अडवला. तलाठी डहाके यांच्या हाताला धरून डंपर मधून खाली ओढले. जर माझ्यावर कारवाई केली तर मी तुम्हाला लाच मागितल्याच्या कारणावरून अडकविल, अशी धमकी दिली. सोबत असलेल्या इसमांनी डहाके यांना मारहाण केली व डंपर मधली वाळू रस्त्यावर ओतून सदरचा डंपर पळवून नेला.
याप्रकरणी तलाठी डहाके यांनी कोपरगाव शहर पोलिसांत राजू शेखसह अनोळखी चालक व अन्य इसमांविरुद्ध दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक प्रदीप देशमुख यांच्यासह उपनिरीक्षक भरत दाते पुढील तपास करीत आहेत.
Web Title: Sand smugglers attack Talathi, seize seized vehicle and take away
See also: Latest Marathi News, Sangamner News, Ahmednagar News, Education Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App