साई संस्थानच्या कर्मचाऱ्याचा प्रताप, दक्षिणा पेटीतून लाखोंची रोकड पळवली
Breaking News| Shirdi Crime : शिपायाने दक्षिणा पेटीतून लाखो रुपयांची रोकड चोरल्याचे उघडकीस आले.
शिर्डी: शिर्डीच्या साईबाबा संस्थानच्या लेखा विभागात कार्यरत असलेल्या बाळासाहेब गोंदकर या शिपायाने दक्षिणा पेटीतून लाखो रुपयांची रोकड चोरल्याचे उघडकीस आले आहे. अविनाश विनायक कुलकर्णी, लेखाधिकारी, यांनी शिर्डी पोलीस ठाण्यात याप्रकरणी फिर्याद दाखल केली आहे.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, एप्रिल 2025 मध्ये झालेल्या दक्षिणा मोजणीच्या सीसीटीव्ही फुटेजच्या तपासणीत हा प्रकार समोर आला. लेखा विभागातील शिपाई बाळासाहेब नारायण गोंदकर याने दि. 4, 8 आणि 11 एप्रिल रोजी दक्षिणा मोजणीदरम्यान 500 रुपयांच्या नोटांचे बंडल चतुराईने लपवले आणि नंतर ते चोरून नेले. ही चोरी झालेली रक्कम अंदाजे सव्वा ते दीड लाख रुपये दरम्यान असण्याची शक्यता आहे. 16 एप्रिल रोजी दक्षिणा मोजणी पूर्ण झाल्यावर नोट मोजणी मशिनमध्ये 46 हजार 500 रुपये आणि 25 एप्रिल रोजी 500 रुपयांचा आणखी एक बंडल (45 ते 50 हजार रुपये) आढळून आला.
या दोन्ही घटना संशयास्पद वाटल्याने सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. त्यावेळी गोंदकर नोटा लपवताना स्पष्ट दिसले. त्याने नोटा मांडीखाली, पॅन्टमध्ये आणि मशीनच्या मागे लपवून नंतर घेऊन गेल्याचे फुटेजमध्ये दिसत आहे. सीईओ गोरक्ष गाडीलकर यांच्या आदेशानुसार, अविनाश कुलकर्णी यांनी गोंदकर याच्याविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. संस्थानने गोंदकर याला अगोदरच प्राथमिक माहितीवर निलंबित केले होते. गुरुवारी या संदर्भातील सविस्तर अहवाल प्राप्त होताच त्याच्यावर गुन्हा दाखल करून बडतर्फीचीही कारवाई सुरू करण्यात आली आहे. शिर्डी पोलीस घटनेचा पुढील तपास करीत आहे.
Breaking News: Sai Sansthan employee Pratap stole lakhs of cash from Dakshina Petti