संगमनेरात कत्तलीसाठी जाणाऱ्या जनावरांची सुटका
Sangamner News: गोवंश तस्करी तथा कत्तलखाने बंद व्हायचे काही नाव घेताना दिसत नाहीत.

संगमनेर: राज्यात गोवंश हत्या बंदीचा कायदा लागू आहे तरीसुद्धा या कायद्याची अंमलबजावणी संगमनेर शहरांमध्ये होताना दिसत नाही. पोलिसांनी वारंवार कारवाया करून देखील येथील गोवंश तस्करी तथा कत्तलखाने बंद व्हायचे काही नाव घेताना दिसत नाहीत. त्यानुसारच शहरातील जमजम कॉलनी येथे सोमवारी (ता. २५) रात्री आठ वाजेच्या सुमारास उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांच्या पथकाने कारवाई करुन चार गोवंश जनावरांची कसायांच्या तावडीतून कत्तलीपासून सुटका केली आहे.
याबाबत शहर पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी, उपविभागीय पोलीस अधिकारी वाघचौरे यांना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली, की जमजम कॉलनीमध्ये एका वाहनात कत्तलीच्या उद्देशाने गोवंश जनावरांना निर्दयतेने बांधून ठेवले आहे. त्यावरुन त्यांनी पथकाला कारवाईच्या सूचना दिल्या. त्यानुसार पोलीस नाईक राहुल डोके व पोलीस कॉन्स्टेबल राहुल सारबंदे यांनी छोटा हत्ती (टाटा एस क्र. एमएच.१४, सीडी.०८३९) हे वाहन थांबवून तपासणी केली असता चार गोवंश जनावरे कत्तलीच्या उद्देशाने निर्दयतेने बांधलेली आढळून आली. पोलिसांनी तात्काळ पंचनामा करून चाळीस हजार रुपये किंमतीची जनावरे व एक लाख रुपयांचे वाहन असा एकूण १ लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला.
याप्रकरणी पोलीस नाईक राहुल डोके यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वाहनचालक सलमान रशीद शेख (रा. विजयनगर, माताडे मळा, संगमनेर) याच्यावर महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायदा कलम १९९५ चे कलम ५ (क), ९ (अ) व प्राण्यांना निर्दयतेने वागवणे कायदा कलम ३, ११ नुसार गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस करत आहे. दरम्यान संगमनेर शहरांमध्ये रोजच गोवंशहत्या होत असून नेमकी ही कुणाच्या आशीर्वादाने या लोकांची कत्तलखाने चालू आहेत? असा प्रश्न आता सुज्ञ नागरिकांना पडला आहे.
Web Title: Rescue of animals going for slaughter in Sangamner
See also: Latest Marathi News, Sangamner News, Ahmednagar News, Education Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App
















































