घरच्यांचा लग्नाला नकार,प्रेमीयुगुलांची रेल्वेसमोर आत्महत्या
Mumbai Suicide: प्रेमविवाहास नकार दिल्याने प्रेमीयुगुलांची रेल्वेसमोर आत्महत्या केल्याची थरकाप उडविणारी घटना.
मुंबई: घरच्यांनी प्रेमविवाहास नकार दिल्याने प्रेमीयुगुलांची रेल्वेसमोर आत्महत्या केल्याची थरकाप उडविणारी घटना समोर आली आहे.
अधिक माहिती अशी की, या घटनेतील तरुणाचे वय १९ आहे. तर, मुलगी १५ वर्षांची आहे. तरुण महाराष्ट्रातील आहे. तर, मुलगी परप्रांतीय असल्याची माहिती समोर आली आहे. दोघेही मुंबईतील भांडुप परिसरातील हनुमानगर येथे वास्तव्यास होते. दोघांचे एकमेकांवर प्रेम असून त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला होता. मात्र, घरच्यांनी त्यांच्या लग्नाला विरोध दर्शवला. यामुळे निराश झालेल्या प्रेमीयुगुलाने एकसोबत आत्महत्यासारखा टोकाचा निर्णय घेतला.
दरम्यान, रविवारी दुपारी अल्पवयीन मुलगी आपल्या आजीसोबत घरातून बाहेर पडली. परंतु, ती अचानक गायब झाली. उशीर झाला तरी मुलगी घरी न परतल्याने तिच्या नातेवाईकांनी भांडुप पोलिसांशी संपर्क साधला आणि ती बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली.
मुलीचा शोध घेत असताना पोलिसांना विक्रोळीत एका प्रेमीयुगुलाने एक्स्प्रेससमोर उडी घेऊन आत्महत्या केल्याची त्यांना माहिती मिळाली. पोलिसांनी अधिक चौकशी केली असता आत्महत्या केलेली मुलगी आणि बेपत्ता मुलगी यांची शरीर रचना एकसारखीच असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. पोलिसांनी ओळख पटण्यासाठी बेपत्ता असलेल्या मुलीच्या नातेवाईकांना बोलावून घेतले. त्यावेळी ही मुलगी आपलीच असल्याचे नातेवाईकांनी कबुली दिली.
याप्रकरणी पोलिसांनी मृत मुलीच्या नातेवाईकांची चौकशी केली असता तिचे मृत तरुणासोबत प्रेमसंबंध असल्याचे त्यांनी सांगितले. परंतु, नातेवाईकांचा त्यांच्या लग्नाला विरोध होता, अशीही माहिती समोर आली. या प्रकरणात प्रांतवाद किंवा जातीवादाचा काही संबंध आहे का याचा तपास पोलीस करत आहेत. तसेच आत्महत्या करण्यापूर्वी प्रेमीयुगुलाने सुसाइड नोट लिहिली आहे का? याचाही शोध घेत आहेत. या घटनेने भांडुपमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
Web Title: Refusal of marriage by relatives, suicide of lovers in front of train
See also: Latest Marathi News, Breaking News live, Sangamner News, Ahmednagar News