बीडमध्ये पवनचक्कीवरून राडा; गोळीबारात एकाचा मृत्यू
Beed Crime News: पवनचक्की प्रकल्पात सुरक्षारक्षकाने चोरट्यांवर गोळीबार केल्याने एकाचा जागीच मृत्यू. (Firing Death)
बीड: बीडचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणानंतर चर्चेत आलेल्या पवनचक्की वादाला पुन्हा एकदा हिंसक वळण लागले आहे. लिंबागणेश परिसरातील पवनचक्की प्रकल्पात सुरक्षारक्षकाने चोरट्यांवर गोळीबार केल्याने एकाचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आहे.
मिळालेली माहिती अशी की, बीड तालुक्यातील लिंबागणेश येथील पवनचक्की प्रकल्पात काही अज्ञात चोरटे साहित्य चोरी करण्याच्या उद्देशाने घुसले होते. त्याच दरम्यान, प्रकल्पाच्या सुरक्षारक्षकाने गोळीबार केला. गोळीबारात एक व्यक्ती गंभीर जखमी झाला असून त्याचा मृत्यू झाला आहे. घटना नेकनूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली असून, पोलिसांनी सुरक्षारक्षकास ताब्यात घेऊन अटक केली आहे. तपास अधिकाऱ्यांच्या पथकाने घटनास्थळी पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे.
याच पवनचक्की प्रकल्पामुळे काही महिन्यांपूर्वी मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली होती. त्यामुळे परिसर आधीपासूनच तणावाखाली होता. आता पुन्हा एकदा त्या प्रकल्पावरून रक्तस्रावाची घटना घडल्याने नागरिकांमध्ये चिंता वाढली आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर पवनचक्कीच्या वादाला धार चढलेली असतानाच, लिंबागणेश परिसरातील पवनचक्कीच्या साहित्याच्या यार्डमध्ये गेल्या काही दिवसांपासून चोरीचे प्रकार घडत होते. यामुळे सुरक्षेची गरज ओळखून याठिकाणी अतिरिक्त सुरक्षारक्षक नेमण्यात आले होते.
गुरुवारी मध्यरात्री काही अज्ञात व्यक्तींनी यार्डमध्ये चोरी करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी ड्युटीवर असलेल्या सुरक्षारक्षक रूप सिंग टाकलाने चोरट्यांवर गोळीबार केला. गोळी एका चोरट्याला लागली आणि तो जागीच ठार झाला. या घटनेची माहिती मिळताच नेकनूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला आणि सुरक्षारक्षक रूप सिंग टाकला याला ताब्यात घेऊन अटक केली आहे.
Breaking News: Rage over windmill in Beed One killed in firing