1 हजाराची लाच घेताना मुख्याध्यापकाला पकडले
Breaking News | Dhule Bribe : शाळेतील मुख्याध्यापकाला सहकारी शिक्षिकेकडून अवघ्या एक हजाराची लाच घेताना पकडण्यात आले.
धुळे: सुरत महामार्गावरील कुसुंबा (ता. धुळे) येथील आदर्श शाळेतील मुख्याध्यापकाला सहकारी शिक्षिकेकडून अवघ्या एक हजाराची लाच घेताना पकडण्यात आले. प्रदीप पुंडलिक परदेशी असे लाचखोर मुख्याध्यापकाचे नाव आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने मंगळवारी (ता. १९) सकाळी ही कारवाई केली. कुसुंबा येथील आदर्श हायस्कूल येथील प्रदीप परदेशी हा मुख्याध्यापक आहे
त्याने शाळेत आयोजित उपक्रमांसाठी खर्च झाल्याचे निमित्त करत शाळेतील सर्व कार्यरत शिक्षकांकडून प्रत्येकी एक हजार, तर शिक्षकेतर कर्मचाऱ्यांकडून प्रत्येकी ८०० रुपये जमा करण्याचे बैठक घेत सांगितले. हजार रुपये देण्यास तक्रारदार उपशिक्षिकेने विरोध दर्शविला. त्यामुळे मुख्याध्यापकाने पैसे दिल्याशिवाय हजेरी नोंदवहीवर सही करायला तक्रारदार उपशिक्षीकेला मज्जाव केला.
संबंधित उपशिक्षिकेने मुख्याध्यापक परदेशी हा एक हजार रुपयांची लाच मागत असल्याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या येथील कार्यालयाकडे केली.
तक्रारीची पडताळणी करत विभागाच्या पथकाने सापळा रचला. यात मंगळवारी सकाळी दहाच्या सुमारास मुख्याध्यापक प्रदीप परदेशी स्वतःच्या कार्यालयात एक हजाराची लाच घेताना पकडला गेला.
या विभागाचे येथील पोलिस उपअधीक्षक अभिषेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक हेमंत बेंडाळे, मंजीतसिंह चव्हाण, रुपाली खांडवी तसेच पथकातील राजन कदम, मुकेश अहिरे, मकरंद पाटील, प्रशांत बागूल, संतोष पावरा, प्रवीण मोरे, प्रवीण पाटील, रामदास बारेला, सुधीर मोरे यांनी ही कारवाई केली. संशयित मुख्याध्यापकावर गुन्हा दाखल झाला असून त्याला अटक करण्यात आली आहे.
Web Title: principal was caught while accepting a bribe of 1 thousand
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study