जिल्ह्यासह संगमनेर तालुक्यात दमदार पावसाची हजेरी
Breaking News | Sangamner Rain: जोरदार वारे, विजांच्या कडकडांसह पावसाने एक तासभरापेक्षा अधिक वेळ जोरदार हजेरी.
Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातील काही भागात पावसाने दमदार हजेरी लावली. पावसाळा सुरवात झाल्याने बळीराजाला दिलासा मिळाला आहे. बुधवारी (दि.५) आणि पावसाने जामखेड, नेवासे येथे हजेरी लावली. संगमनेर तालुक्यात आज दि. 6 रोजी जोरदार हजेरी लावत बळीराजाला दिलासा दिला आहे.
संगमनेर तालुक्यात शहरासह आजू बाजूंच्या गावात दुपारी तीन वाजेच्या सुमारास काळे ढग दाटून आले. जोरदार वारे, विजांच्या कडकडांसह पावसाने एक तासभरापेक्षा अधिक वेळ जोरदार हजेरी लावली. शेतात पाणी साचले होते. शेतकऱ्यांची एकच तारांबर उडाली. रस्त्याने जाणाऱ्या येणाऱ्या प्रवाशांचे चांगलेच हाल झाले. गुंजाळवाडी परिसरात भास्कर गुंजाळ यांच्या घराजवळ असलेल्या सरूच्या झाडावर वीज कोसळली. यामध्ये झाडाची हानी झाली आहे.
जामखेड तालुक्यातील जवळा व नान्नज परिसरात बुधवारी (दि.५) दुपारच्या सुमारास जोरदार पावसाने हजेरी लावली.दुपारी चारच्या सुमारास अचानक आकाशात काळे कुट्ट ढग तयार झाले. त्यानंतर काही वेळातच विजेच्या कडकडाटासह जोरदार पावसाला सुरुवात झाली. अचानक सुरू झालेल्या पावसाने जवळा व नान्नज गावांना चांगलेच झोडपले. जवळा परिसरात जोरदार पाऊस झाल्याने काही शेतातून पाणी वाहिले, तर अनेक शेतात पाणी साचले आहे.
खरीप हंगामाच्या दृष्टीने चांगला पाऊस झाला. आता झालेल्या पावसाने काही भागात पेरणीपूर्व मशागतीची कामे मार्गी लागतील; पण अनेक ठिकाणी मशागतीसाठी पावसाची प्रतीक्षा करावी लागणार आहे. या पावसामुळे शेतकरी सुखावला असून शेतीच्या मशागतीला वेग येणार आहे.
बुधवारी सायंकाळी नेवासा शहरासह परिसरात यंदाच्या हंगामातील पहिल्याच दमदार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे परिसरातील बळीराजाला दिलासा मिळाला आहे. नेवासा शहरातील बाजारपेठेत पाणीच पाणी झाले होते. शेतातील मशागती उरकल्या आहेत. पावसाने हजेरी लावल्याने कपाशी लागवडीला आता वेग येणार आहे.
उसाला हा पाऊस लाभदायक ठरेल असे म्हटले जात आहे. या पावसाने शहरातील बसस्थानकाबाहेरील रस्ते, नगरपंचायत चौकातील रस्ते जलमय झाले होते. अचानक सुरू झालेल्या पावसाने नेवासाकरांची तारांबळ उडाली. भाजी, फळे विक्रेत्यांच्या मालाचे अचानक आलेल्या पावसाने नुकसान झाले असल्याची माहिती मिळाली आहे.
Web Title: Presence of heavy rain in district and Sangamner taluka
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study