अहमदनगर: कारवाईची चाहूल लागताच पोलीस कर्मचारी थेट ऊसात
Ahmednagar News: किरकोळ गुन्ह्यात मदत करण्यासाठी ४ हजार रुपयांची लाच (Bribe) स्वीकारताना, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने एका पोलीस कर्मचाऱ्यास पकडले
श्रीगोंदा: बेलवंडी पोलीस ठाण्यातील दाखल असलेल्या किरकोळ गुन्ह्यात मदत करण्यासाठी ४ हजार रुपयांची लाच स्वीकारताना, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने एका पोलीस कर्मचाऱ्यास पकडले. मात्र, पथकाची चाहूल लागताच या कर्मचाऱ्याने पोलीस ठाण्यातून पळ काढला.
ज्ञानेश्वर रावसाहेब पठारे असे या पोलिस कर्मचाऱ्याचे नाव आहे. बेलवंडी पोलीस ठाण्यात ज्ञानेश्वर पठारे कार्यरत आहे. एका गुन्ह्यात जामीन मिळवून देण्यात मदत करण्यासाठी त्याने तक्रारदाराकडे १० हजार रुपयांची मागणी केली होती. याबाबत अहमदनगर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे संबंधिताने तक्रार केली. त्यानुसार पथकाने बुधवारी (ता. २१) सायंकाळी ५ वाजेदरम्यान बेलवंडी पोलीस ठाण्यात सापळा रचला.
पठारे याने पंचासमक्ष ४ हजार रुपये लाचेची मागणी केली. ही रक्कम पंचासमक्ष पोलीस ठाण्यात मागील खोलीतील कपाटात ठेवण्यास सांगून स्वीकारली. मात्र, नंतर आपण लाचेच्या जाळ्यात अडकल्याचे लक्षात येताच, त्याने पोलीस ठाण्यातून पलायन केले. पोलीस ठाण्यापासून काही अंतरावर असलेल्या उसात तो लपून बसला. लाचलुचपत पथकातील अधिकाऱ्यांनी त्याचा पाठलाग केला, पण तो सापडला नाही.
दरम्यान, बेलवंडी पोलिस ठाण्यात पठारे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक गहिनीनाथ गमे, पोलीस अमलदार कराड, महिला पोलीस नाईक राधा खेमनर यांच्या पथकाने ही कारवाई केली.
Web Title: the policeman was caught by the anti-corruption department team while accepting a bribe
See also: Latest Marathi News, Ahmednagar News, Education Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App