अहमदनगर: पोलीस ठाण्यातच पोलीस कॉन्स्टेबलचा आत्महत्येचा प्रयत्न
Breaking News | Ahmednagar: भिंगार कॅम्प पोलीस ठाणे आवारातच पोलीस अंमलदाराचा विषारी पदार्थ सेवन करून आत्महत्येचा प्रयत्न.
अहमदनगर: भिंगार कॅम्प पोलीस ठाणे आवारातच पोलीस अंमलदार प्रवीण जगताप यांनी विषारी पदार्थ सेवन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. सदरची घटना शनिवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास घडली असून जगताप यांना उपचारासाठी सुरूवातीला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, अंमलदार जगताप भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात नियुक्तीस आहेत. त्यांना शनिवारी रात्री ड्युटी असल्याने ते पोलीस ठाण्यात आले होते. पोलीस ठाण्यात असतानाच त्यांनी अचानक विषारी पदार्थाचे सेवन केले. यामुळे एकच गोंधळ उडाला. सदरचा प्रकार ठाण्यात उपस्थित असलेल्या इतर पोलीस अंमलदारांच्या लक्षात येताच त्यांनी जगताप यांना तत्काळ उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले. घटनेची माहिती वरिष्ठ पोलीस अधिकारी यांना मिळताच शहर पोलीस उपअधीक्षक अमोल भारती, सहायक पोलीस निरीक्षक योगेश राजगुरू यांनी रुग्णालयात धाव घेतली.
जगताप यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. आर्थिक व्यवहारातून त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला असल्याची प्राथमिक माहिती आहे. यासंदर्भात कॅम्प पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून अद्याप गुन्हा दाखल करण्यात आला नसल्याचे सहायक पोलीस निरीक्षक राजगुरू यांनी सांगितले.
Web Title: police constable attempted suicide by taking poisonous substance in the police station itself
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study