Bribe | पोलीस हवालदारास लाच स्वीकारताना रंगेहाथ अटक
लातूर | Latur : लातूर जिल्ह्यातील औसा पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदाराने एका प्रकरणात तक्रारदार यांना मदत करण्यासाठी पाच हजारांची मागणी करीत तीन हजाराची लाच (Bribe) स्वीकारताना या हवालदारास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे. सदर पोलीस हवालदाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हवालदार राजेंद्र गोरख लामतुरे असे त्याचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, औसा पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार राजेंद्र गोरख लामतुरे यांनी एका प्रकरणात तक्रारदार यांना मदत करतो म्हणून पाच हजारांची मागणी केली. त्यातील तीन हजार रुपये स्वीकारताना रंगेहाथ पकडले आहे. औसा पोलिसात भादंवि 294, 323, 506 प्रमाणे दाखल असलेल्या गुन्ह्यात मदत करण्यासाठी पोलीस हवालदार लामतुरे यांनी तक्रारदारास पाच हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. तडजोडी अंती पहिला हप्ता 3 हजार व दुसरा हप्ता 2 हजार अशी लाच मागितली.
शुक्रवारी पाच वाजण्याच्या सुमारास लामतुरे यांनी तक्रारदार यांच्याकडून तीन हजार रुपयांची लाच पंचासमक्ष स्वीकारली. ही लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्यांना रंगेहाथ पकडले. सापळा अधिकारी म्हणून पोलीस निरीक्षक अन्वर मुजावर व लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या टीमने ही कारवाई केली आहे. अधिक तपास अन्वर मुजावर करीत आहेत.
Web Title: Police Constable accepted Bribe