अहिल्यानगर: गावठी कट्ट्यासह दोघांना पोलिसांनी पाठलाग करून केले जेरबंद
Breaking News | Ahilyanagar Crime: पोलिसांनी पाठलाग करून सराईत गुन्हेगाराला गावठी कट्ट्यासह जेरबंद केले.
नेवासा: नेवासा तालुक्यातील नांदुर शिकारी गावा जवळ नेवासा पोलिसांनी पाठलाग करून सराईत गुन्हेगाराला गावठी कट्ट्यासह जेरबंद केले. याबाबत अधिक माहिती अशी की, मंगळवार 29 जुलै रोजी पहाटे नेवासा पोलिसांचे वाहन पोलीस कॉन्स्टेबल वाल्मीक वाघ व चालक संतोष खंडागळे यांच्यासह रात्रगस्त करीत असताना पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास भेंडा फॅक्टरी जवळ दोन संशयित मोटरसायकलवर वेगात जाताना दिसून आले.
रात्रगस्त वरील पोलिस वाघ व खंडागळे यांना संशय आल्याने त्यांनी मोटारसायकल थांबवण्याचा प्रयत्न केला असता कट मारून मोटरसायकल चालक कुकानाकडे वेगाने निघून गेला. त्यावेळी असं लक्षात आले की दोघांपैकी एकजण हा पोलीस रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आहे. त्यानंतर तातडीने नाकाबंदी सुरू करून रात्रगस्तवरील पोलिसांनी त्यांचा पाठलाग करून दोघांना नांदूर शिकारी गावाजवळ पकडले. दोघांना नाव गाव विचारले असता सचिन रमेश पन्हाळे (वय 25) व आदित्य संतोष जाधव (वय 21) दोन्ही रा. शेवगाव असे सांगितले. पाठलाग करीत असताना दोघांनी हातातून गावठी कट्टे फेकले. 20 हजार रुपये किमतीच्या गावठी कट्ट्यांसह एक टीव्हीएस स्टार मोटारसायकल, दोन मोबाईल असा एकूण 75 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
या दोघांवर पोलीस कॉन्स्टेबल वाल्मीक वाघ यांच्या फिर्यादीवरून भारतीय हत्यार कायदा अन्वये गुन्हा नोंद केला असून तपास हवालदार शहाजी आंधळे हे करीत आहेत. सचिन पन्हाळे याच्यावर यापूर्वी पोलीस ठाणे शेवगाव, एमआयडीसी (MIDC) व नेवासा येथे दंगल घडवून आणणे, अग्नीशस्त्र बाळगणे, जंगली प्राण्यांची तस्करी आदी गंभीर स्वरूपाचे 4 गुन्हे दाखल आहेत. सचिन पन्हाळे यास मागील वर्षी लोकसभा निवडणुकीच्या वेळी अग्नीशस्त्र हवेत मिरवताना नेवासा पोलिसांनी रंगेहात पकडले होते. नागरिकांकडे अशा कट्ट्यांबाबत काही माहिती असल्यास न भिता ती प्रत्यक्ष भेटुन किंवा मोबाईल कॉल करून द्यावी असे आवाहन पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांनी केले असून माहिती देणार्याचे नाव गुप्त ठेवण्यात येईल असे स्पष्ट केले आहे.
Breaking News: Police chase and arrest two people including Gavthi Kattya