जेजुरीत चाकूने सपासप वार करत एकाचा खून
Breaking Jejuri Pune Crime News: शेतीतील विहिरीमधील पाण्याच्या पाळीवरून वाद होऊन एकाचा सपासप वार करीत खून केल्याची घटना.
जेजुरी: शेतातील विहिरीच्या पाण्याच्या पाळीवरून वाद होऊन एका शेतकऱ्याचा चाकूने वार करत खून केल्याची घटना समोर आली आहे. अविनाश मल्हारी जगताप (वय-४०) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर बाळूदास काळूराम जगताप (वय-५५ रा. आंबळे, ता. पुरंदर, जि. पुणे) याला जेजुरी पोलिसांनी अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आंबळे हद्दीतील जगताप वस्ती येथे अविनाश जगताप यांची गट क्रमांक ८४८ मध्ये शेत जमीन आहे. शनिवारी (दि.१५) रोजी सकाळी पावणे नऊ वाजताच्या सुमारास या शेतीतील विहिरीमधील पाण्याच्या पाळीवरून वाद होऊन आरोपी काळूदास याने खिशातील चाकू काढून अविनाश जगताप यांच्यावर चार ते पाच वार केले.
या हल्ल्यात अविनाश जगताप यांचा मृत्यू झाला. तसेच यावेळी याठिकाणी उपस्थित असणारे अविनाश जगताप यांचे वडील मल्हारी जगताप, गणेश जगताप यांच्यावर आरोपीने चाकूने वार करून दोघांना गंभीर जखमी केले. अशी फिर्याद सौरभ दत्तात्रय जगताप यांनी जेजुरी पोलिस स्टेशनमध्ये दिली आहे.
दरम्यान या घटनेची माहिती मिळताच जेजुरी पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक दीपक वाकचौरे, पोलिस उपनिरीक्षक सर्जेराव पुजारी, महेश पाटील, पोलिस हवालदार दशरथ बनसोडे, विठ्ठल कदम यांनी तातडीने घटनास्थळी जाऊन पळून जाण्याच्या तयारीत असणाऱ्या आरोपीला ताब्यात घेतले. जेजुरी पोलिसांनी आरोपी बाळूदास जगताप यांच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला असून या प्रकरणी सपोनि दीपक वाकचौरे पुढील तपास करीत आहेत.
Web Title: person was killed by stabbing a person in Jejuri