लग्नाची मागणी घातल्याने बेदम मारहाणीत एकाचा मृत्यू
Pune Crime: मुलीला लग्नाची मागणी घातल्याचा राग आल्याने बेदम मारहाण करून एकाचा खून करण्यात आल्याची घटना.
पुणे: मुलीला लग्नाची मागणी घातल्याचा राग आल्याने बेदम मारहाण करून एकाचा खून करण्यात आल्याची घटना शनिवारी रात्री गोखलेनगरमधील जनवाडी परिसरात घडली, यासंदर्भात पोलिसांनी चार जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला असून, दोघांना अटक केली आहे. दिलीप यल्लपा अलकुंटे (४५, रा. जनता वसाहत, जनवाडी) असे खून झालेल्याचे नाव आहे.
याप्रकरणी रामजी निलू राठोड (५०), अनुसया रामजी राठोड (४५) करण रामजी राठोड (१९) व एका अल्पवयीन मुलाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अलकुंटे यांची वहिनी पुष्पा राजेश अलकुंटे यांनी चतुःशृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदवली आहे. दिलीप अलकुंटे एका गॅरेजमध्ये काम करतो. त्याने शनिवारी रात्री रामजी याच्याकडे मुलीला मागणी घातली. तुझ्या आणि मुलीच्या वयात खूप अंतर असल्याचे सांगन रामजी याने त्याला विरोध केला. त्यावेळी झालेल्या भांडणातून रामजी, त्याची पत्नी अनुसया, मुलगा करण यांनी दिलीपला बेदम मारहाण केली. त्यामध्ये गंभीर जखमी झालेल्या दिलीपला ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. याप्रकरणी चतुः शृंगी पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. उपचारादरम्यान रविवारी सकाळी दिलीप मरण पावला. त्यानंतर याबाबत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला, याप्रकरणी रामजी आणि अनुसया यांना अटक करण्यात आली असून, अन्य दोघांचा शोध जारी करण्यात आला आहे.
Web Title: One died after being brutally beaten for demanding marriage
See also: Latest Marathi News, Breaking News live, Sangamner News, Ahmednagar News