निसर्ग वादळी वाऱ्याने अकोलेत घेतला एकाचा बळी
अकोले: अकोले तालुक्यात काल सायंकाळी जोरदार निसर्ग वादळी वाऱ्याने हजेरी लावली. यामध्ये अनेक घरे पडून, पत्रे उडाली, झाडे पडली. मात्र एक दुर्दैवी घटना अशी घडली की, लाहित येथील एका माथाडी कामगारचा बळी यात गेला आहे.
तालुक्यातील लाहित येथील सागर पांडुरंग चौधरी वय ३२ या मजुराचा अंगावर भिंत कोसळून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. संगमनेर येथील भाजीपाला मार्केटमध्ये माथाडी कामगार म्हणून काम करीत होता. घराशेजारी असलेल्या जनावरांच्या गोठ्यात सागर गेला असता अचानक गोठ्याची भिंत त्याच्या अंगावर पडली. आजूबाजूच्या परिसरातील लोकांनी धाव घेत भिंतीच्या डीगार्याखालून बाहेर काढले व संगमनेर येथील रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचार सुरु असताना गुरुवारी सकाळी त्याचा मृत्यू झाला. या घटनने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
निसर्ग चक्रीवादळामुळे वाऱ्याने अकोले तालुक्यात बदगी गावातील कौतुकवाडी मध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यामध्ये काही ठिकाणी झाडे पडली ,विद्युत वाहिन्या पडल्या तर काही ठिकाणी राहत्या घरावरील पत्रे उडून गेले. काल दुपारी ४ वाजता जोराचे वारे आल्याने शांताबाई संभाजी शिंगोटे यांच्या रहात्या घराचे बाजूचे पत्रे उडाल्याने घरातील साहित्याचे व जीवनावश्यक वस्तूचे नुकसान तसेच घरापुढील विजेचा खांब कोसळल्याने विद्युत तारा घराच्या बाजूला पडल्या आहेत. त्याच परिसरातील संता पाटीलबुवा शिंगोटे यांच्या शेतातील घरावरील पत्रे व ताडपत्री उडाल्याने घरातील सर्व साहित्य व धान्य भिजले. तसेच इतरही लोकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शासनाने लवकरात लवकर पंचनामे करावेत अशी मागणी या परिसरातील लोकांनी केली आहे.
Website Title: News one victim in Akole by storm