जामखेड: कलिंगड व्यापाऱ्याच्या खुनातील पारेवाडी ता. जामखेड येथील फरार आरोपी नंदू तुकाराम पारे यास जामखेड पोलिसांनी अटक केली आहे. दोन वर्षापूर्वी खून करून पसार झालेला अखेर पोलिसांच्या अटकेत सापडला आहे.
२०१८ मध्ये मुंबई येथील कलिंगड व्यापारी हसन उमर शेख वय ५० याचा गळा आवळून खून करण्यात आला होता. ओळख पटू नये यासाठी त्याचा मृतदेह खेड ता. कर्जत येथील भीमा नदीत पात्रात टाकून दिला होता. व्यापाऱ्याने विकत घेतलेल्या कलिंगडाची परस्पर विक्री करण्याच्या उद्देशाने मोहन कुंडलिक भोरे रा. कवडगाव ता. जामखेड, अक्षय रामदास राउत, चंद्रकांत महादेव राउत, नंदू तुकाराम पारे रा. पारेवाडी ता. जामखेड यांनी संगनमत करून खून केला होता. २० मे २०१८ रोजी रात्री आठ वाजेच्या दरम्यान हा खून करण्यात आला होता. याबाबत कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. यातील तीन आरोपींना अटक करण्यात आली होती यातील आरोपी नंदू तुकाराम पोरे हा गुन्हा झाल्यापासून पसार होता.
कारेगाव ता.शिरूर जि.पुणे येथे टेम्पोतून प्रवास करीत असताना पारे याला पोलिसांची भनक लागताच त्याने टेम्पोतून उडी मारून पळून जाण्याचा प्रयत्न केला होता.
दोन जूनला नंदू पारे हा कारेगाव ता.शिरूर येथून अहमदनगरला टेम्पोने येणार आहे अशी माहिती उप विभागीय पोलीस अधिकारी संजय सातव यांना खबऱ्यामार्फत मिळाली. त्यानंतर त्यांनी पथक पाठविले. त्यांच्या पथकाने त्याला पकडले.
Website Title: News Merchant murder accused arrested Jamkhed Ahmednagar