अकोल्यात आलेल्या हर्षवर्धन सदगीरचे जल्लोषात स्वागत, सत्कार, 11 लाख प्रदान
अकोले(News): महाराष्ट्र केसरीचा किताब पटकविल्यानंतर प्रथमच अकोल्यात आलेल्या हर्षवर्धन सदगीरचे जल्लोषात स्वागत करण्यात आले.अकरा लाख रुपयांची थैली देऊन त्याचा सत्कार करीत अकोलेकरानी त्याला हिंद केसरी आणि ओलंपिक साठी शुभेच्छा दिल्या. भविष्यातही तालुका त्याच्या पाठीशी उभा राहील अशी ग्वाही जेष्ठ नेते मधुकरराव पिचड यांनी दिली.
हर्षवर्धन अकोले तालुक्यातील कोंभाळणे गावचा पठया. गोरक्षनाथ बलकवडे (भगुर)आणि काका पवार(पुणे)यांचे तालमीत तो तयार झाला.महाराष्ट्र केसरी झाल्याबद्दल त्याचा तालुक्यातील जनतेच्या वतीने नागरी सत्कार आयोजित करण्यात आला होता.अकोल्यात येताच त्याचे उत्साहात स्वागत करण्यात आले.महात्मा फुले चौकापासून कार्यक्रम स्थळापर्यंत त्याची ढोल ताशा लेझिम अश्या पारंपारिक वाद्यांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली.
शाल फेटा स्मृती चिन्ह आणि अकरा लाख रुपयांचा धनादेश देऊन त्याचा श्री पिचड यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.या वेळी त्याचे दोन्ही वस्ताद,तसेच वडील मुकेश,आई ठकुबाई,दोन्ही आजोबा किसान सदगीर व कोंडाजी ढोंन्नर यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला.
पद्मश्री सन्मान जाहिर झालेल्या राहिबाई पोपेरे यांचाही या वेळी विशेष गौरव करण्यात आला.
माजी आमदार वैभव पिचड,जिल्हा बँकेचे अध्यक्ष सीताराम गायकर ,तसेच महाराष्ट्र केसरी गुलाब बर्डे यांचेसह कुस्ती क्षेत्रातील अनेक मान्यवर व पहिलवान या वेळी उपस्थित होते.
आपणा सर्वांच्या आशीर्वादाने येथे पर्यंत पोहचलो.आपण आज जो विश्वास दाखविला आणि मदत केली त्याचे चीज करू अशी ग्वाही हर्षवर्धनने या वेळी दिला.हिंद केसरी व्हावे तसेच आंतरराष्ट्रीय कुस्ती पदक मिळवावे या आपण व्यक्त केलेल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे आश्वासन त्याने दिले.
मला जाहीर झालेला पद्मश्री पुरस्कार हा काळ्या मातीचा,या तालुक्यांचा सन्मान असल्याचे राहिबाई पोपेरे म्हणाल्या.गावोगाव देशी बियाणे बँका तयार झाल्या पाहिजेत.कितीही पुरस्कार मिळाले तरी या काळ्या मातीशी , बियाणांशी माझी जी नाळ जुळली आहे त्याच्याशी कधीही प्रतारणा करणार नाही अशी ग्वाही त्यांनी दिली.
श्री पिचड म्हणाले हर्षवर्धन व राहिबाई या दोघांनी अकोल्याचे नाव राज्यात मोठे केले आहे.तालुक्यात ज्या विकासाच्या संधी निर्माण केल्या त्या मुळे येथे हर्षवर्धन आणि राहिबाई निर्माण झाल्या असे ते म्हणाले.
जेष्ठ नेते मिनानाथ पांडे,काका पवार,श्री बलकवडे यांनीही यावेळी मनोगते व्यक्त केली.
सत्कार समितीचे स्वागताध्यक्ष वसंत मनकर यांनी अगस्ति कारखान्यास तालुक्यातील विविध संस्था,राजकीय नेते,व्यापारी,शिक्षक,विद्यार्थी,सरकारी नोकर ,शैक्षणिक संस्था अश्या सर्वच घटकांनी मदत केल्यामुळे हर्षवर्धन मदत करता आली असे सांगितले.
बबलु धुमाळ यांनी स्वागत केले.नगरसेवक प्रमोद मंडलिक यांनी सूत्रसंचालन केले.राजेंद्र सदगीर यांनी आभार मानले.
जेष्ठ पत्रकार प्रकाश टाकळकर
Website Title: News Harshavardhan Sadgir welcomed in Akole