खळबळजनक: कारच्या डिक्कीत आढळला विवस्त्र मृतदेह
नागपूर | Nagpur: कबाड्याने भंगारमध्ये विकत घेतलेल्या एका कारच्या डिकीत एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह (Dead Body) आढळून आल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे.. ही घटना तहसील पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या गार्डलाईन परिसरात उघडकीस आली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली होती.
तहसील पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या नौशाद नामक भंगार व्यवसायिकाने आठ दिवसांपूर्वी एक जुनी कार विकत घेतली होती. त्याच्या गोदाम परिसरात ती पडून होती. आज ती कापण्यासाठी तो आणि त्याच्याकडे काम करणारे कार जवळ जाताच त्यांना दुर्गंध येऊ लागला. त्यांनी कारची डिक्की उघडताच त्यात ३५ वर्ष वयोगटातील मृतदेह आढळला. याबाबत पोलिसांना माहिती देण्यात आली. मृतदेह विवस्त्र अवस्थेत असल्याने आरोपीने हत्या करून तो डिक्कीत लपविला असावा असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
सदर व्यक्तीची अद्याप ओळख न पटल्याने त्याच्याबाबत कोणत्या पोलिस ठाण्यात मिसिंगची तक्रार दाखल आहे काय? याबाबत पोलिस शोध घेत आहे. आरोपींनी त्यांची हत्या करुन मृतदेह डिकीत टाकल्याचा संशय पोलिस व्यक्त करीत असताना, मृतदेहाच्या शरीरावर कुठल्याच जखमा नसल्याची माहिती पुढे आली. नेमकी खून की दुसरे काही याचा तपास पोलीस करीत आहे.
Web Title: Naked Dead body found in car trunk