पैशांचा पाऊस पाडण्यासाठी आपल्या मेहुणीवर नराधमाने आठ महिने बलात्कार
Rape Case: नागपुरात धक्कादायक घटना समोर आली आहे. सतत आठ महिने मेहुणीवर बलात्कार, पत्नीला विश्वासात घेऊन पैशाचा पाउस पाडण्याचे आमिष दाखवून बलात्कार.
Nagpur Crime News : एकीकडे अंधश्रद्धेवरुन बागेश्वर धामचे महाराज पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री आणि अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे सहअध्यक्ष श्याम मानव यांच्यातील वाद देशभर गाजत असताना, नागपुरात पैशांचा पाऊस पाडण्यासाठी आपल्या मेहुणीवर नराधमाने सतत आठ महिने बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेत पीडित अल्पवयीन मुलीच्या बहिणीनेही मदत केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, आरोपी तरुण आणि त्याची पत्नीचे विवाहाआधीपासून प्रेम संबंध होते. प्रेमात असताना त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. मात्र त्यांच्या लग्नाला नातेवाईकांचा विरोध होता. त्यामुळे दोघांनीही प्रेमविवाह केला. या प्रकरणात अटकेत असलेल्या आरोपी पत्नीची लहान बहिण नववीत शिकत होती. या दोन्ही आरोपी सोबत ती राहत होती. त्यामुळे संसाराचा खर्च उचलणे दोघांसाठीही कठीण जात होते. अनेक आर्थिक अडचणींचा सामना दोघांनाही करावा लागत होता. दोघेही पैसे कमविण्याचे साधन शोधत होते. दरम्यान, आरोपीची एका भोंदू बाबासोबत ओळख झाली. त्याने त्याला पैशांचा पाऊस पाडण्याचे आश्वासन दिले. तसेच यासाठी काही अघोरी विधीही त्याने आरोपीला सांगितला. आधीच आर्थिक संकटातून जात असल्याने दोघांनीही हे विधी करण्यास होकार दिला.
आरोपीने केलेल्या दाव्यानुसार बाबाने त्याला पैशांचे पाऊस पाडण्यासाठी अल्पवयीन मेहुणीशी शारीरिक संबंध ठेवण्यास सांगितले. सुरुवातीला आरोपीच्या पत्नीने नकार दिला. नंतर आरोपीने आपल्या पत्नीला युट्यूबवर पैशांचा पाऊस कसा पडतो याबाबत सर्च करुन पैशांचे पाऊस पाडण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपायांपैकी शारिरीक संबंध बनवणे हा एक उपाय असल्याचे पटवून सांगितले. पैशांच्या तंगीला कंटाळलेल्या पत्नीनेही यास होकार देत आपल्या लहान बहिणीला पतीसोबत संबंध बनविण्यासाठी प्रवृत्त केले.
पत्नीने होकार दिल्यावर तिच्या लहान बहिणीसोबत सतत आठ महिन्यांपर्यंत आरोपीने मेहुणीचे शारीरिक शोषण केले. एवढे झाल्यावरही पैशांचा पाऊस पडला नाही. त्यामुळे अल्पवयीन मुलीने शारीरिक संबंध ठेवण्यास नकार दिला. त्यानंतर आरोपीने अल्पवयीन मुलीला मारहाण करण्यास सुरुवात केली. सततच्या अत्याचारामुळे मुलीची प्रकृती खालावली. याची माहिती नातेवाइकांना मिळताच त्यांनी मुलीला हॉस्पिटलमध्ये दाखल केले. आरोपी हा शोषण करीत असल्याचे तिने नातेवाइकांना सांगितले. त्यानंतर मुलीसह नातेवाइकांनी नरखेड पोलिस स्टेशन गाठून तक्रार दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपी पती आणि पत्नीला अटक केली आहे.
पैशांचा पाऊस पाडण्याचे आमिष दाखवून अल्पवयीन मेहुणीवर तब्बल आठ महिने बलात्कार करण्यात आला. नरखेड पोलिस स्टेशनअंतर्गत ही धक्कादायक घटना उघडकीस आली. याप्रकरणी पोलिसांनी बलात्कारासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून दाम्पत्याला गजाआड केले आहे. पीडित मुलीची बहीण आणि तिच्या पतीने हा अत्याचार केल्याने खळबळ उडाली आहे.
Web Title: Murderously rape her sister-in-law for eight months to make money rain
See Latest Marathi News, Ahmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App