अनैतिक संबंधाच्या कारणावरुन माजी उपसरपंचाचा खून
Breaking News | Sangli Murder Case: अनैतिक संबंधाच्या कारणावरुन खून करण्यात आल्याची कबुली दोघा संशयितांनी दिली.
सांगली: खानापूर तालुक्यातील घानवड येथील माजी उपसरपंच बापूराव देवाप्पा चव्हाण (वय ४७) यांचा गुरुवार दि. ५ रोजी भरदिवसा धारदार शस्त्राने गळा चिरुन खून करण्यात आला होता. याप्रकरणी चार दिवसांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण पोलिसांच्या पथकाने दोघांना जेरबंद केले आहे. विशाल बाळासो मदने (वय २३) आणि सचिन शिवाजी थोरात (२५, रा. दोघेही धानवड, ता. खानापूर) अशी दोघांची नावे आहेत. अनैतिक संबंधाच्या कारणावरुन हा खून करण्यात आल्याची कबुली दोघा संशयितांनी दिली आहे.
माजी उपसरपंच बापूराव चव्हाण यांची गार्डी ते नेवरी रस्त्यावर पोल्ट्री तर विटा येथे सराफी दुकान आहे. गुरुवार दि. ५ रोजी दुपारी ते धानवड येथून गार्डी नेवरी रस्त्यापासून काही अंतरावर असलेल्या गार्डी हद्दीत असणाऱ्या त्यांच्या पोल्ट्री शेडकडे बुलेटवरुन निघाले होते. ते गार्डीच्या हद्दीत आल्यानंतर त्यांच्या गळ्यावर धारदार शस्त्राने वार करुन त्यांचा खून करण्यात आला होता. यानंतर परिसरात खळबळ उडाली होती. याबाबत राहुल भगवान चव्हाण (रा. धानवड) यांनी विटा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.
स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी खूनप्रकरणी संशयितांच्या शोधार्थ स्वतंत्र पथक स्थापन केले होते. चार दिवसांपासून पोलीस संशयितांच्या मागावर होते. दरम्यान, दोघे संशयित मिरज ते पंढरपूर रस्त्यावरील सिध्देवाडी पुलानजीक येणार असल्याची माहिती पोलीस पथकास मिळाली. त्यानुसार परिसरात सापळा लावण्यात आला. काहीवेळाने दोघे युवक परिसरात येवून थांबले. त्यांच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने पोलिसांनी त्यांना पळून जाण्याची संधी न देता ताब्यात घेतले. पोलीस चौकशीत संशयित विशाल मदने याने अनैतिक संबंधाच्या कारणावरुन बापूराव चव्हाण याचा खून केल्याची कबुली दिली. या कारवाईत पोलीस निरीक्षक संजय मोरे आणि धनंजय फडतरे, सहा. पोलीस निरिक्षक सिकंदर वर्धन, पोलीस कर्मचारी सूर्यकांत साळुंखे, प्रमोद साखरपे, संजय पाटील, करण परदेशी, अजय पाटील, हणमंत लोहार, महेश देशमुख, उत्तम माळी आदींसह अन्य जणांनी सहभाग घेतला.
Web Title: Murder of former Deputy Sarpanch due to immoral relationship
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study