बहिणीने चाकूने वार करत भावाचा केला खून- Murder Case
Ahmednagar | Shrirampur | श्रीरामपूर: भाऊ नेहमी मारहाण करत शिवीगाळ करत होता. कायमच्या या कटकटी व जाचाला कंटाळून श्रीरामपूर येथील बहिणीने टोकाचे पाऊल उचलत मनमाड येथे तिच्या भावाचा पोटावर चाकूने वार करत त्याचा खून (Murder) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेनंतर बहिणीने मनमाड पोलीस स्टेशन गाठत खुनाच्या गुन्ह्याची कबुली दिली. याप्रकरणी मनमाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नाशिक जिल्ह्यातील मनमाड शहरातील विवेकानंद नगर क्र. 2, या भागात मंगळवार दि. 26 एप्रिल रोजी घटना घडली. मनमाड येथे संदीप गोगे हा त्याची आई व इतर नातेवाईकांसमवेत राहत होता. आई आजारी असल्यामुळे श्रीरामपूर येथे राहणारी त्याची बहिण शोभा गारुडकर ही आईची सेवा करण्यासाठी मनमाड येथे काही महिन्यांपूर्वी गेली होती. संदीप हा व्यसनी होता. तो शोभाला नेहमीच मारहाण, त्रास देत असे.
मनमाड येथे आल्यावर भाऊ संदीपचा खुपच त्रास वाढू लागला. नेहमीच शिवीगाळ करणे, मारहाण करणे अशी कृत्ये करू लागला. मंगळवार दि. 26 एप्रिल रोजी दुपारी शोभा जेवण करत असताना संदीपने तिला शिवीगाळ करुन मारहाण केली. संदीपच्या सततच्या त्रासाला कंटाळून अखेर शोभाने टोकाचे पाऊल उचलत संदीपच्या पोटावर सपासप वार केले. घाव खोल असल्यामुळे संदीप रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता. त्याचा तेथेच जागीच मृत्यू झाला. शोभाने घटनेनंतर थेट मनमाड पोलीस स्टेशन गाठले व आपल्या भावाचा खून केल्याची कबुली दिली. याप्रकरणी मनमाड पोलीस ठाण्यात शोभा गारुडकर विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Web Title: Murder Case Sister stabs brother to death