अल्पवयीन मुलीने दुचाकीस्वाराला उडवले, एक ठार
Breaking News | Pune Accident: शिरूर तालुक्यात घडली पोर्श अपघाताची पुनरावृत्ती; एक ठार, एक जखमी.
शिक्रापूर: पुणे जिल्ह्यातीलहिट अँड रन प्रकरणात एका बड्या बांधकाम व्यावसायिकाच्या मुलाने दारूच्या नशेत आलिशान पोर्श कार चालवून दोघांना उडवल्याची घटना देशभरात गाजत असतानाच शिरूर तालुक्यात अशीच काहीशी पुनरावृत्ती झाली असून एका पोलीस पाटलाच्या अल्पवयीन मुलीने मालवाहू पिकअप चालवताना दुचाकीला धडक दिल्याने एका युवकाचा जागीच मृत्यू होऊन एक तरुण गंभीर जखमी झाला. ही घटना शनिवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास घडली. याबाबत शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे पोलीस पाटलासह त्याच्या अल्पवयीन मुलीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेत अरुण विठ्ठल मेमाणे (३०) याचा मृत्यू झाला, तर महिंद्र रावसाहेब बांडे (२६, दोघे रा. वडगाव बांडे, ता. दौंड, जि. पुणे) हा जखमी झाला. याबाबत सतीश विठ्ठल मेमाणे (२६, रा. वडगाव बांडे, ता. दौंड) यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली. शनिवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास आरणगाव (ता. शिरूर) येथील वडगाव बांडे रस्त्याने अरुण मेमाणे व महिंद्र बांडे हे दोघे दुचाकीवरून न्हावरेकडे जात असताना अचानक आरणगाव रस्त्याने येणाऱ्या पिकअपने (एमएच-१२-एसएफ-३४३९) दुचाकीला जोराची धडक दिली. दरम्यान, पिकअपने दुचाकीसह दोघांना काही अंतर फरफटत नेले. अपघात होताच शेजारील नागरिकांनी दुचाकीवरील जखमीना शिरूर येथील रुग्णालयात उपचारासाठी नेले. मात्र उपचारापूर्वीच अरुण मेमाणे यांचा मृत्यू झाला, तर महिंद्र बांडे हे जखमी झाल्याने त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
Web Title: Minor girl hits biker, kills one
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study