संगमनेरातील म्हाळुंगी, आढळा नद्यांना पूर तर अकोलेत
Sangamner Rain News: म्हाळुंगी आणि आढळा या नद्यांना पूर.
संगमनेर: गणेश चतुर्थीच्या दिवशी बुधवारी (दि. १) संध्याकाळी सुरू झालेला पाऊस रात्रभर सुरूच होता. जोरदार पावसाने तालुक्यातून वाहणाऱ्या म्हाळुंगी आणि आढळा या दोन नद्यांना पूर आला होता. काही ठिकाणी रहिवासी भागात पुराचे पाणी शिरल्याने तेथील नागरिकांची धावपळ उडाली. शहरातील रस्त्यांवर पाण्याचे पाट वाहत असतानाचे चित्र होते. काही सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या मंडपात ही पावसाचे पाणी शिरले.
अकोले तालुक्याच्या उत्तरेत असलेल्या आढळा व भोजापूर या दोन्ही जलाशयाच्या पाणलोट आणि लाभक्षेत्रात सर्वदूर पावसाला सुरुवात झाली. ही दोन्ही जलाशये भरल्याने धरणात येणारे सर्व पाणी नदीपात्रातून वाहण्यास सुरूवात झाल्याने म्हाळुंगी आणि आढळा या नद्यांना पूर आला होता. म्हाळुंगी नदीचा प्रवाह अधिक असल्याने पुलावरून पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती.
संगमनेर तालुक्याच्या दहा महसुली मंडलात ही जोरदार पाऊस झाला. त्यात सर्वाधिक ११५.८ मिमी पाऊस साकूर महसूल क्षेत्रात झाला. त्या खालोखाल धांदरफळ ८९.५ मिमी घारगाव व डोळासणे प्रत्येकी ५४.५ मिमी, आश्वी व पिंपरणे प्रत्येकी ५३.५ मिमी, समनापूर ४७.३ मिमी, शिबलापूर ४५.८ मिमी, तळेगाव ३९.३ मिमी व संगमनेर ३५ मिमी अशी नोंद आहे.
अकोलेत १६६ मिमी; मुसळधार पाऊस
ढगांच्या गडगडाटासह अवकाळी पावसाने धुवाधार बरसत गणरायाचे स्वागत केले. अकोलेत १६६ तर देवठाण आढळा धरण परिसरात १७० व निळवंडे धरणावर १५३ मिलिमीटर पाऊस कोसळल्याची नोंद झाली असून यावर्षीचा या भागातील हा सर्वात मोठा पाऊस पाणी ठरला आहे, तर आंबड पाझर तलाव काही तासात ९० टक्के भरला.
Web Title: Mhalungi in Sangamner, Adha rivers flood and Akole