फी भरायला पैसे नसल्यामुळे मराठा विद्यार्थ्याची आत्महत्या
महाविद्यालयाची फीस भरू शकला नसल्याने शिक्षण अर्धवट सोडून गावाकडे परत गेला. शनिवारी शेतात जाऊन विष प्राशन करून आत्महत्या (Suicide).
जिंतूर : छत्रपती संभाजीनगर येथील एका महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्याची कौटुंबिक परिस्थिती बेताची असल्याने तो महाविद्यालयाची फीस भरू शकला नसल्याने शिक्षण अर्धवट सोडून गावाकडे परत गेला. दरम्यान, शनिवारी (दि. २१) रोजी शेतात जाऊन विष प्राशन करून आत्महत्या केली.
औंढा तालुक्यातील दौडगाव येथील विठ्ठलराव चित्रे यांना एक एकर कोरडवाहू शेती असून, पाच मुली व दोन मुले आहेत. मोठ्या मुलाने संसाराचा गाडा ओढण्यासाठी वडिलांची होत असलेली ओढाताण पाहता शिक्षण अर्धवट सोडून शेती कामात हातभार लावला तर लहान मुलगा परमेश्वर विठ्ठल चित्रे ( १७ ) हा छत्रपती संभाजीनगरमधील एका खासगी महाविद्यालयात अकरावीला वाणिज्य शाखेत शिक्षण घेत होता. तिथेच त्याने एक खासगी कोचिंग क्लासही लावला होता. प्रवेश घेताना क्लास व महाविद्यालयाची काही फीस भरली होती. परंतु घरात अठराविश्व दारिद्र्य असल्याने त्याच्या वडिलांस महाविद्यालयाची व शिकवणी वर्गाची फीस वेळेवर भरणे शक्य झाले नाही. कोचिंग सेंटरचालक व महाविद्यालय प्रशासन उर्वरित फीससाठी तगादा लावत असल्याने परमेश्वर याने वडिलांकडे फीसची रक्कम मागितली. परंतु पुरेसा पाऊस न पडल्याने शेतीत काहीच उत्पन्न न झाल्यामुळे सोयाबीनची काढणी झाल्यानंतर फीस भरू, असे वडिलांनी आश्वासन दिले होते. परंतु शिक्षणाचे
होणारे नुकसान भरून निघणार नसल्याने तो नेहमी चिंतित असायचा. दरम्यान, काही दिवसांवर परीक्षा असल्यामुळे फीस न दिल्याने परीक्षा देता येणार नाही. यामुळे तो परत गावाकडे आला. मराठा समाजाला आरक्षण असते तर आपल्याला एवढे पैसे भरण्याची आवश्यकता पडली नसती, असेही त्याने वडिलांना सांगितले. तो शनिवार, (दि. २१) ऑक्टोबर रोजी शेतात गेला व तिथेच त्याने विषारी औषध प्राशन केले. त्यास गंभीर अवस्थेत शहरातील ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मृत घोषित केले. याबाबत जिंतूर पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
Web Title: Maratha student commits suicide due to lack of money to pay fees
See also: Latest Marathi News, Sangamner News, Ahmednagar News, Education Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App