मनोज जरांगे पाटील राजकीय भूमिका स्पष्ट करणार
Breaking News | manoj Jarange Patil: काही ठिकाणी नेमका कोणत्या पक्षाला पाठिंबा द्यायचा आणि कोणाच्या विरोधात लढायचे ही सगळी राजकीय भूमिका आपण १३ ऑगस्ट रोजी पश्चिम महाराष्ट्राचा दौरा केल्यानंतर स्पष्ट करणार असल्याची माहिती मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांनी दिली.
छत्रपती संभाजीनगर: मराठा समाजाच्या ओबीसी आरक्षणाची बाजू विधिमंडळात ठामपणे मांडणाऱ्या गोरगरीब उमेदवारांना आम्ही संधी देणार आहोत. यामध्ये सर्व जातीधर्मीय उमेदवारांचा समावेश असेल. काही ठिकाणी नेमका कोणत्या पक्षाला पाठिंबा द्यायचा आणि कोणाच्या विरोधात लढायचे ही सगळी राजकीय भूमिका आपण १३ ऑगस्ट रोजी पश्चिम महाराष्ट्राचा दौरा केल्यानंतर स्पष्ट करणार असल्याची माहिती मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांनी दिली.
अंतरवालीसराटी (जि.जालना) येथील पाचव्या टप्प्यातील बेमुदत उपोषण स्थगित केल्यानंतर जरांगे-पाटील शहरातील एका खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. गुरुवारी (दि. २५) त्यांनी माध्यमांना आंदोलनाच्या पुढील टप्प्याची माहिती दिली. ते म्हणाले, २० ते २४ जुलैदरम्यान आपण अंतरवलीसराटी येथे उपोषण केले. मात्र, या चार दिवसांत राज्य शासनाच्या कोणत्याही मंत्र्यांने किंवा शिष्टमंडळाने आपल्याशी संपर्क साधला नाही. याशिवाय सलाइन घेऊन उपोषण करणे आपल्याला आवडले नाही. चौथ्या टप्यात उपोषण सोडण्याची विनंती केलेल्या मंत्री शंभुराज देसाई यांनी दोन महिन्यांचा वेळ मागितला होता. त्यामुळे त्यांना आपण आता १३ ऑगस्टपर्यंत वेळ देऊन उपोषण स्थगित केले. ७ ते १३ अशा ७ दिवसांच्या पश्चिम महाराष्ट्र दौऱ्यानंतर राज्य शासन मराठा समाजाच्या ओबीसी आरक्षणाचा निर्णय घेईल, अशी अपेक्षा आहे. तसा निर्णय घेतला नाही तर आपण राज्यात सर्व जातीधर्मातील गोरगरीब तरुणांना उमेदवारी देऊन विधानसभा निवडणूक लढण्याचा निर्णय जाहीर करणार असल्याचे ते म्हणाले. दरम्यान, त्यांनी राज्यातील भाजपच्या टीकाटिप्पणी करणाऱ्या नेत्यांवरही तोंडसुख घेतले. उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांना थांबवावे, असे आवाहन मनोज जरांगे-पाटील यांनी केले.
पुणे प्रकरणात मला आताच वॉरंट का?
पुणे येथे आम्ही काही समाजबांधवांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित नाटकाचे आयोजन केले होते, ते प्रकरण फार जुने असून, आताच का उकरून काढले जात आहे? असा प्रश्न मनोज जरांगे-पाटील यांनी उपस्थित केला. कोणत्याही पद्धतीने मला अडकवायचे असे षड्यंत्र सरकार आखत असल्याचा आरोपही त्यानी केला. राणे कुटुंबीयानी समाजासाठी काम केले आहे. त्यांच्यावर मी कधीच टीका केलेली नाही; परंतु विनाकारण ते बोलणार असतील, तर माझा नाईलाज होईल, असा इशाराही जरांगे-पाटील यांनी दिला.
आम्ही दगड दिला तरी निवडून द्या !
मराठा समाजासह मुस्लिम, कैकाडी, बंजारा, धनगर, लिंगायत आदी समाज बांधवांच्याही आरक्षणाचा प्रश्न आहे. त्यामुळे आम्ही आमच्या सर्वांच्या हक्कांसाठी एकत्र येऊन लढणार आहोत. सगळे हेवेदावे विसरून आम्ही दगड दिला तरी समाज बांधवांनी त्यांनाच मतं द्यावीत, असे आवाहन या वेळी जरांगे-पाटील यांनी केले.
Web Title: Manoj Jarange Patil will explain the political role
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study