महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या घोषणेला उशीर का? निवडणूक आयुक्तांनीच सांगितले कारण…
Maharashtra Assembly Election: हरियाणा आणि जम्मू-काश्मीर या दोन राज्यांच्या विधानसभा निवडणुकीसाठीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला मात्र महाराष्ट्र राज्याचा निवडणुका उशिरा करण्यात आलेल्या आहेत.
मुंबई: केंद्रीय निवडणूक आयोगाकडून (Election Commissions) आज हरियाणा आणि जम्मू-काश्मीर या दोन राज्यांच्या विधानसभा निवडणुकीसाठीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. मात्र दरवेळी हरियाणासोबत होणाऱ्या महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक लांबणीवर का टाकण्यात आली, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. याबाबत केंद्रीय निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी स्पष्टीकरण दिलं असून जम्मू-काश्मीरमध्ये निवडणुका घेण्यासाठी आवश्यक असलेल्या यंत्रणेचा विचार करून आणि महाराष्ट्रातील सण-उत्सव लक्षात घेत निवडणूक उशिरा घेण्यात येत असल्याचं स्पष्टीकरण कुमार यांनी दिलं आहे.
“मागील पंचवार्षिकला महाराष्ट्र आणि हरियाणा या दोन राज्यांच्या निवडणुका एकत्र झाल्या होत्या, मग यावेळी महाराष्ट्राच्या निवडणुकांना उशीर का?” असा प्रश्न पत्रकार परिषदेदरम्यान राजीव कुमार यांना विचारण्यात आला. त्यावर ते म्हणाले की, “पूर्वी महाराष्ट्र आणि हरियाणाच्या निवडणुका एकत्र झाल्या होत्या. ३ नोव्हेंबर ही हरियाणाची तारीख असून महाराष्ट्र विधानसभेची मुदत २६ नोव्हेंबरला संपत आहे. मात्र मागच्या वेळी जम्मू-काश्मीरमधील निवडणुका हा मुद्दा नव्हता. यंदा ४ राज्यांच्या विधानसभा निवडणुका आहेत. जम्मू-काश्मीर, हरियाणा, महाराष्ट्र आणि झारखंड या राज्यांनंतर दिल्ली विधानसभेसाठी मतदान होईल. यंदा जम्मू-काश्मीरच्याही निवडणुका होत असल्याने आणि तिथं लागणाऱ्या यंत्रणेचा विचार करता आम्ही दोन-दोन राज्यांच्या निवडणुका एकत्र घेण्याचा निर्णय घेतला. तसंच जम्मू-काश्मीरची निवडणूक प्रक्रिया सुरू असतानाच मध्येच दुसऱ्या राज्यासाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर करणं योग्य नाही.
हरियाणा आणि जम्मू-काश्मीरची निवडणूक कधी होणार?
जम्मू काश्मीरमधील विधानसभा निवडणूक तीन टप्प्यांमध्ये होणार आहे. पहिल्या टप्प्यातील मतदान १८ सप्टेंबर रोजी, दुसऱ्या टप्प्यातील मतदान २५ सप्टेंबर आणि तिसऱ्या टप्प्यातील मतदान १ ऑक्टोबर रोजी होणार आहे. तर हरियाणातील निवडणुका एकाच टप्प्यात होणार असून १ ऑक्टोबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडेल आणि ४ ऑक्टोबर रोजी दोन्ही राज्यांतील मतमोजणी करण्यात येणार आहे.
दरम्यान, यंदा जम्मू काश्मीरमध्ये १० वर्षांनंतर निवडणुका होणार असून एकूण ९० जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. यामध्ये जम्मूतील ४३ आणि काश्मीरमधील ४७ जागांचा समावेश असणार आहे. निवडणूक आयोगाने जम्मूमधील सांबा, कठुआ, राजौरी, किश्तवाड, डोडा आणि उधमपूर या भागातील एक-एक जागा वाढवण्यात आली असून काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यात एक विधानसभा मतदारसंघ वाढवण्यात आला आहे. दरम्यान महाराष्ट्र राज्याच्या निवडणुका कधी जाहीर होणार यावर अजून प्रश्नचिन्ह आहे.
Web Title: Maharashtra Assembly Election 2024 Update
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study