अकोले: वडिलांचा खुन करून मृतदेह विहिरीत टाकणाऱ्या मुलास जन्मठेप
Sangamner Akole News: वडिलांचा खुन करून पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह विहिरीत टाकणाऱ्या मुलास जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
संगमनेर: तीन शेळ्या व दोन बोकड विकलेल्या पैशाचे काय केले? असे विचारणार्या बापाचा नराधम मुलाने डोक्यात लाकूड मारून खून केला. पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह विहीरीत टाकणार्या मुलास संगमनेर येथील अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश दिलीप एस. घुमरे यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.
काळू रामदास घाणे (रा. बोरवाडी, वारंघुशी, ता. अकोले) असे आरोपीचे नाव आहे. याबाबत माहिती अशी की, बोरवाडी येथे घाणे कुटुंबिय राहत होते. 23 फेब्रुवारी 2022 रोजी काळू रामदास घाणे हा घरी आला. त्याने वडील रामदास लक्ष्मण घाणे यांच्याकडे पैसे मागितले. त्यावर वडीलांनी त्याला ‘तू मागे 3 शेळ्या व 2 बोकड विकले त्याचे पैसे काय केले? असे विचारल्याचा काळू यास राग आला. त्याने वडिलांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तर जवळच पडलेले लाकूड घेऊन त्याने वडिलांच्या डोक्यात मारले. जबरी घाव बसल्याने रामदास घाणे हे जागीच ठार झाले. त्याच दिवशीच्या रात्री काळू घाणे याने वडिलांच्या मृतदेहाला दगड बांधून तो विहीरीत टाकून दिला.
याबाबत राजू रामदास घाणे याने राजूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार काळू रामदास घाणे याचेविरुद्ध भारतीय दंड संहिता 302, 201 प्रमाणे गुन्हा दाखल झाला. तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक खैरनार यांनी सदर गुन्ह्याचा तपास करून न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले.
सदरचा खटला जिल्हा न्यायाधीश, संगमनेर यांच्या कोर्टात चालला. सदर खटल्यात सरकार पक्षातर्फे एकूण 5 साक्षीदार तपासण्यात आले. यामध्ये साक्षीदार, फिर्यादी व आरोपीची आई यांची साक्ष महत्त्वाची ठरली. न्यायालयाने आईच्या साक्षी पुराव्यावर विश्वास ठेवून आरोपी काळू रामदास घाणे यास दोषी धरून भारतीय दंड संहिता कलम 302 नुसार जन्मठेप व भारतीय दंड संहिता कलम 201 पुरावा नष्ट करणे या खाली 3 वर्षे सश्रम कारावास व 2500 रुपये दंड, दंड न भरल्यास 3 महिने कारावास तसेच 302 अन्वये जन्मठेप व 5 हजार रुपये द्रव्यदंड व दंड न भरल्यास 1 वर्षे सश्रम कारावास अशी शिक्षा ठोठावली आहे.
Web Title: Life imprisonment for the son who murdere his father and dumped his body in a well
See also: Latest Marathi News, Sangamner News, Ahmednagar News, Education Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App