Home अकोले अकोल्यात शेतकऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांसाठी किसान सभेचे बेमुदत आंदोलन सुरू

अकोल्यात शेतकऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांसाठी किसान सभेचे बेमुदत आंदोलन सुरू

अकोले : शेतकऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष व किसान सभेच्या वतीने अकोले तहसील कार्यालयासमोर पाऊस चालू असतानाही बेमुदत आंदोलन सुरू करण्यात आले आहे. 

वन कायद्यात आदिवासी विरोधी बदल करण्याचे कारस्थान बंद करा, वनाधिकार कायद्याची अंमलबजावणी करून जमिनी करणाऱ्यांच्या नावे करा, जमीन कसणाऱ्यांच्या नावे पीक पाहणी लावा, शेत रस्त्यांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावा, सर्व श्रमिकांना हक्काचे घरकूल द्या, वंचितांचा घरकुलाच्या यादीत समावेश करून ‘ड’ यादीस तातडीने मंजुरी द्या, हिवरगाव येथील ठाकरवाडीला तातडीने पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करा आदी मागण्यांसाठी दि. २५ जून रोजी तहसील कार्यालयावर बेमुदत धरणे आंदोलन करण्यात आले होते. २७ जून रोजी किसान सभेच्या वतीने भव्य मोर्चा काढण्यात आला होता. आंदोलनाच्यावेळी शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करण्यात आल्या होत्या. मात्र मान्य केलेल्या मागण्यांची अद्यापही अंमलबजावणी करण्यात आली नाही. शेतकऱ्यांमध्ये यामुळे प्रशासनाच्या विरोधात मोठ्या प्रमाणात असंतोष खदखदत आहे. मागण्यांची अंमलबजावणी न झाल्यास तहसील कार्यालयासमोर पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा किसान सभेने दिला होता. 

त्यानुसार आज शेकडो शेतकरी पावसातही अकोले तहसील कार्यालयासमोर आंदोलनास बसले आहेत. अकोल्याबरोबरच संगमनेर, पारनेर, राहुरी तालुक्यातील शेतकरीही आपल्या मागण्यांसाठी आंदोलनात सहभागी झाले आहेत. वनाधिकार कायद्यांतर्गत करण्यात आलेले दावे विविध ग्रामपंचायतींमधून गायब करण्यात आले आहेत. अनेक दावे प्रलंबित आहेत. आपल्या या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी वनजमिनी कसणारे शेतकरी आंदोलनात मोठ्या प्रमाणात सहभागी झाले आहेत. तालुक्यात पंतप्रधान घरकूल योजनेत मोठी अनियमितता व गैरप्रकार झाला असल्याचा आरोप करण्यात आला आहे. श्रीमंतांचा घरकुलांच्या यादीत समावेश केला गेला आहे. मात्र गरिबांना, बेघरांना, वंचितांना याद्यांमधून वगळण्यात आले आहे. सदरच्या याद्या दुरुस्त कराव्यात व प्राधान्याने बेघरांना घरकुले द्यावीत. या मागण्यांसाठी किसान सभेने वारंवार आवाज उठविला आहे. आंदोलनामध्ये या मागणीचा पाठपुरावा करण्यासाठी मोठ्या प्रमाणात शेतकरी महिलाही सहभागी झाल्या आहेत. जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी, तहसीलदार, वन अधिकारी, गटविकास अधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले आहे. प्रशासनाने शेतकऱ्यांच्या या मागण्यांकडे तातडीने लक्ष द्यावे. मागण्या मान्य कराव्यात व अंमलबजावणी करावी, अशी मागणी किसान सभा करीत आहे. आंदोलनाकडे दुर्लक्ष झाल्यास दि. ३ ऑगस्ट रोजी भव्य मोर्चा काढून तहसील कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशारा किसान सभेच्या वतीने देण्यात आला आहे. यावेळी डॉ. अजित नवले, सदाशिव साबळे, नामदेव भांगरे, एकनाथ मेंगाळ, साहेबराव घोडे, लहू जोशी, आराधना बोऱ्हाडे, जुबेदा मणियार, लक्ष्मण घोडे, प्रकाश साबळे, शांताराम वारे, सयाजी रोडे, मथुराबाई बर्डे, पुंजा शेंडगे, कैलास खंडागळे, किसन मधे, दिलीप हिंदोळे, पोपट चव्हाण हे उपस्थित होते.

Website Title: Letest News An Unarmed Agitation Of The Kisan Sabha For The Pending Questions Of Farmers Was Started In Akola

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here