राष्ट्रवादीत पुन्हा महाभूकंप?, छगन भुजबळ मोठा निर्णय घेणार?; अंतर्गत हालचाली वाढल्या
NCP Chhagan Bhujbal: ओबीसी नेत्यांशी चर्चा करून शरद पवार गटात सामील होणे, भाजपमध्ये जाणे किंवा स्वतःचे ओबीसी संघटन तयार करणे या पर्यायांवर विचार करत आहेत.
नाशिक: छगन भुजबळ यांची राष्ट्रवादी काँग्रेसमधील नाराजी गेल्या काही दिवसांपासून चर्चेचा विषय आहे. अजित पवार यांच्यावर टीका करूनही पक्षाकडून कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने भुजबळ यांनी मोठा निर्णय घेण्याची तयारी केली आहे. ते ओबीसी नेत्यांशी चर्चा करून शरद पवार गटात सामील होणे, भाजपमध्ये जाणे किंवा स्वतःचे ओबीसी संघटन तयार करणे या पर्यायांवर विचार करत आहेत. यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे भूकंप होण्याची शक्यता आहे.
राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. नाराजी व्यक्त करूनही एकही नेता भेटायला आला नाही, किंवा एकाही नेत्याने विचारपूस केली नसल्याने भुजबळ अधिकच नाराज झाल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळेच भुजबळ यांच्या अंतर्गत हालचाली वाढल्या आहेत. या पार्श्वभूमीवर भुजबळ आज आणि उद्या मुंबईतील ओबीसी नेत्यांची भेट घेणार आहेत. त्यांची मते जाणून घेणार आहेत. त्यानंतरच ते मोठा निर्णय घेणार असल्याचं सांगितलं जात आहे, असं सूत्रांनी सांगितलं.
नाशिकमध्ये भुजबळ यांनी नाशिकमध्ये समता परिषदेच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला होता. त्यावेळी सर्वच नेत्यांनी त्यांना वेगळा निर्णय घेण्याचा आग्रह धरला होता. भुजबळ यांनीही यावेळी मनातील भावना व्यक्त करताना अजित पवारांवर टीका केली होती. त्यांच्या एकाधिकारशाहीवर भुजबळांनी हल्ला चढवला होता. मात्र, सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांनी साथ दिल्याचं म्हटलं होतं. पण त्यानंतरही राष्ट्रवादीचा एकही नेता भुजबळ यांना भेटायला गेला नाही. एकाही आमदार किंवा मंत्र्याने भेट न घेतल्याने भुजबळ पक्षात एकाकी पडल्याचं चित्र आहे. त्यामुळे भुजबळ अधिकच अस्वस्थ झाल्याचं सांगितलं जात आहे.
छगन भुजबळ यांनी अजित पवार यांच्यापासून वेगळं होण्याचा निर्णय घेतला तर भुजबळांसमोर तीन पर्याय असल्याचं सांगितलं जात आहे. एक म्हणजे शरद पवार गटात प्रवेश करणं, दुसरं म्हणजे भाजपमध्ये प्रवेश करणं आणि तिसरं म्हणजे ओबीसींचं देशव्यापी संघटन उभं करणं. त्यामुळे भुजबळ कोणता पर्याय निवडतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
दरम्यान, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे खासदार निलेश लंके यांनी छगन भुजबळ यांना शरद पवार गटात येण्याचं आवतन दिलं आहे. छगन भुजबळ हे तळागाळातून आलेले नेतृत्व आहे. त्यांना मंत्रिपदापासून डावलून त्यांच्यावर अन्याय करण्यात आला आहे. भुजबळ जर आमच्याकडे आले तर आम्ही त्यांचे स्वागत करू, अशी प्रतिक्रिया निलेश लंके यांनी दिली आहे.
Web Title: Earthquake again in NCP Chhagan Bhujbal will take a big decision
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study