राजूर: शिवरायांचा आदर्श तरुणांनी घ्यावा: प्रा.सतीष उखर्डे
राजूर: समाजातील सर्व जाती धर्माच्या जनतेला सोबत घेऊन कल्याणकारी स्वराज्य स्थापन करणारे रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार आत्मसात करून तरुणांनी समाजहितासाठी पुढाकार घ्यावा असे प्रतिपादन प्रा.सतीष उखर्डे यांनी केले.
येथील गुरुवर्य रा.वि. पाटणकर सर्वोदय विद्या मंदिर कनिष्ठ महाविद्यालयात कालामंडळ उद्घाटन आयोजित कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे उप प्राचार्य श्री. पर्बत एल.पी. तर प्रमुख पाहुणे म्हणून प्राचार्य श्री. लेंडे एम.डी. हे होते. या कार्यक्रमाचे आयोजन कलामंडळ अध्यक्ष श्री.धतुरे ए.एफ, सौ. सावंत बिना, श्री. घिगे बी.एस. व श्री. गुंजाळ अजित यांनी केले होते.
प्रा. उखर्डे म्हणाले की, भारतातच नव्हे तर संपूर्ण विश्वात छत्रपती शिवरायांची रयतेचा राजा म्हणून ओळख आहे.शिवरायांना समजून घ्यायचे असेल तर इतिहासाची पाने चाळणे ही काळाची गरज आहे.असे सांगून शिवाजी महाराजांनी सर्व जाती धर्मियांना समानतेची वागणूक देऊन स्त्रियांच्या अब्रूचे रक्षण करून न्याय व सन्मान मिळून देण्याचे काम केले आहे परंतु आजची तरुण पिढी दिवसेंदिवस व्यसनाधीन होत आहे. या भरकटलेल्या तरुणांनी शिवरायांचे विचार आत्मसात करावे तसेच शिक्षण क्षेत्रात ध्येय केंद्रित करून उच्च पदस्थ व्हावे असे आवाहन प्रा. उखर्डे यांनी केले.
या कलामंडळ उद्घाटनप्रसंगी विद्यार्थिनी पायल बेनके, वेदिका हंगेकर, काजल संगभोर यांनी गीत गायन व नृत्य सादर केली. या कार्यक्रमप्रसंगी श्री.पाबळकर एस.एस. श्री. ताजणे बी.एन. श्री.बुऱ्हाडे डी.जी. श्री. तारू व्ही.टी. आदींची व्यासपीठावर उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. सावंत बिना यांनी केले. अध्यक्षीय सूचना श्री. कोटकर एस.बी. यांनी केली तर कार्यक्रमाचे आभार श्री. घिगे बी.एस. यांनी मानले.
Website Title: Latest News SVM Rajur Kalamandal Innovation