अकोले: एक व्यक्ती म्हणून जगण्यापेक्षा एक व्यक्तिमत्व म्हणून जगा- दिपाली देवळे.
सर्वोदय खिरविरेत मिनी सायन्स सेंटरचे उद्घाटन.
पिंपळगाव नाकविंदा/प्रतिनिधी- व्यक्ती कधी ना कधी संपते पण व्यक्तिमत्व मात्र सदैव जीवंत राहते. म्हणून एक व्यक्ती म्हणून जगण्यापेक्षा एक व्यक्तिमत्व म्हणून जगा. असे प्रतिपादन सहयोग सेवा मुंबई संस्थेच्या मॅनेजर दिपाली देवळे यांनी केले.
सर्वोदय विदया मंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक विदयालय खिरविरे(ता.अकोले) येथे सेवा सहयोग फाऊंडेशन मुंबई यांच्या आर्थिक सहकार्यातुन मिनी सायन्स सेंटर साकारण्यात आले. या सायन्स सेंटरचे उद्घाटन विविध मान्यवरांच्या प्रमुख उपस्थित करण्यात आले. याप्रसंगी दिपाली देवळे प्रमुख अतिथी म्हणून विचार मंचावरून बोलत होत्या.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष सत्यनिकेतन राजुर संस्थेचे सचिव टि.एन. कानवडे हे होते.
याप्रसंगी मिनी सायन्स सेंटरचे प्रकल्प प्रमुख विनायक बर्वे, राम रोकडे, माजी प्राचार्य तथा संचालक प्रकाश टाकळकर, संचालक एम.बी. वाकचौरे, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दिनेश शहा, उपक्रमशील शिक्षक भाऊसाहेब कासार, संजय मुखेकर, ठेकेदार अशोक वर्पे, गोकुळ नेहे,विदयालयाचे प्राचार्य अंतुराम सावंत, यांसह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी उपस्थित होते.
दिपाली देवळे पुढे बोलताना म्हणाल्या की, प्रतिदिवस प्रयत्नशिल राहून आपल काम अजुन चांगले करत रहा. तुम्हाला त्याचे फळ वेळ आल्यावर नक्कीच मिळणार असल्याचे सांगत ग्रामीण भागातील निसर्गाचे तसेच गोंडस मुलांचे भरभरून कौतुक केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष टि. एन. कानवडे यांनी मुंबईची संस्था खेडयात आल्याचे समाधान व्यक्त करत कोणीतरी भेटल्याशिवाय जीवनाचे चाके ओडली जात नाही.जेथे कोणीच पोहचत नाही तेथे सहयोग फाऊंडेशन कार्यरत आहे. त्यासाठी जीवनात यशस्वी उपयोग करून घेतला पाहीजे.जे काम कराल ते प्रेमाने, आवडीने, जिद्धीने करा असे विचार प्रतिपादीत केले.
संचालक प्रकाश टाकळकर यांनी लहानांनी मोठे व्हायचे असेल तर मोठयांना अल्पकाळ लहान व्हाव लागते. हा विचार आत्मसात करून मोठे व्हायचे असेल तर विज्ञानाची कास धरावी लागेल त्यासाठी ग्रामीण भागात मिनी सायन्स लॅब नक्कीच महत्वपूर्ण असल्याचे प्रतिपादन केले.
कृतीशील शिक्षक भाऊसाहेब कासार यांनी वैज्ञानिक दृष्टीकोनाचा अधिकार व्यक्त होणे व्यक्ती महत्व जडणघडणीतील महत्वाची पायरी असुन वैज्ञानीक तत्व रूजतात याचा आनंद व्यक्त करत आपल्यातुन शास्त्रज्ञ निर्माण व्हावेत अशी अपेक्षा व्यक्त केली.
दिनेश शहा यांनीही आपले विचार प्रतिपादीत केले. सहयोग फाऊंडेशन संस्थेकडून यावेळी एल सीडी प्रोजेक्टर, लॅबसाठी लाईट फिटींग, ग्रिन बोर्ड, लॅपटॉप, मायक्रोस्कोप, ग्रंथालय कपाट व पुस्तके विद्यालयास भेट देण्यात आली.
मान्यवरांचा सत्कार विद्यार्थ्यांनी स्वतः बनवलेले गुच्छ, दिवटी, शाल तसेच काळ भात देऊन करण्यात आला. यावेळी इतिमाग या पुस्तकाचेही प्रकाशन करण्यात आले.
मान्यवरांचे स्वागत प्राचार्य अंतुराम सावंत यांनी केले तर कृतीशील शिक्षक दिपक पाचपुते यांनी प्रास्ताविक केले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन कविता वाळुंज यांनी केले तर भास्कर सदगीर यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.
Website Title: Latest News SVM Khirvire Science Center