मामाने विषारी औषध पिल्याने भाच्याची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या
टाकळीभान: श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभान येथे मामा भाच्यात झालेल्या वादातून मामाने विषारी कीटकनाशक पिल्याने घाबरलेल्या भाच्याने जवळ असलेल्या विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याची घटना सोमवार दिनांक २७ रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास घडली.
टाकळीभान येथील नवनाथ वेणुनाथ खंडागळे वय ३० व भाचा मनोज चव्हाण वय २२ हे त्यांच्या शेतात वस्ती करून राहत होते. खंडागळे यांनी त्यांच्या बहिणीला काही जमीन दिली आहे त्यामुळे मामा भाचे शेती करतात सोमवारी पाच वाजेच्या सुमारास दोघात वाद झाला. त्यामुळे मामा नवनाथ खंडागळे यांनी विषारी कीटकनाशक प्राशन केले. हे पाहून घाबरलेल्या मनोज चव्हाण याने जवळ असलेल्या विहिरीत उडी मारून आपले जीवन संपविले. ही माहिती मिळताच ग्रामपंचायत सदस्य कान्हा खंडागळे यांनी घटनास्थळी जाऊन तातडीने नवनाथ खंडागळे यांना उपचारासाठी श्रीरामपूर येथे हॉस्पिटलमध्ये दाखल केले. भाच्याचा विहिरीत तपास सुरु करण्यात आला. मात्र अंधार पडल्याने त्याचा शोध घेता आला नाही. काल मंगळवारी सकाळी रावसाहेब बनकर यांनी विहिरीतून मृतदेह बाहेर काढला. खंडागळे यांची प्रकृती ठीक असल्याचे समजते. टाकळीभान पोलीस चौकीचे हेड कॉन्स्टेबल रवींद्र पवार पोलीस नाईक गोरे यांनी मृतदेहाचा पंचनामा केला.
Website Title: Latest News mama Bhacha trying Suicide