संगमनेर तालुक्यात बिबट्याने गायीच्या गोठ्यात हल्ला केल्याने तीन शेळ्या ठार
संगमनेर: संगमनेर तालुक्यातील शेळकेवाडी परिसरात बिबट्याने गायींच्या गोठ्यात हल्ला केल्याने तीन शेळ्या ठार झाल्याची घटना रविवारी दिनांक ३१ मध्यरात्री घडली. या घटनेने परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
संगमनेर तालुक्यातील अकलापूर येथील शेळकेवाडी परीसरात जयेश काशिनाथ शेळके यांच्या मालकीच्या गोठ्यातील गायी व शेळ्यांवर बिबट्याने मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास हल्ला केला आहे.
गायी व शेळ्यांनी आरडाओरडा केल्याने जयेश शेळके यांना जाग आली त्यावेळी त्यांनी बॅटरी चमकवून बिबट्याला पळवून लावले. या हल्ल्यात तीन शेळ्यांचा मृत्यू झाला आहे. वनपाल रामदास शेटे यांच्या मार्गदर्शनाखाली वनविभाग कर्मचारी दिलीप बहिरट, दीपक वायाळ, सविता थोरात यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला आहे. या परिसरात वनविभागाने पिंजरा लावावा अशी मागणी शेतकरी वर्ग करीत आहे. याअगोदरही या परिसरात बिबट्याने हल्ला केलेला होता.
Website Title: Latest News Bibatya attack on goats in sangamner taluka