पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयंम योजना; अनुसूचित विद्यार्थ्यांचे पैसे बँकेत जमा होणार
अकोले: अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना सरकारी वसतिगृहात प्रवेश मिळाला नसेल तर त्यांना बँक खात्यात सरकारद्वारे पैसे दिले जाणार आहेत. यातून त्यांना भोजन, निवास व शैक्षणिक साहित्य खरेदी करता येणार आहे. बारावीनंतरच्या उच्च शिक्षणासाठी पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयंम योजना सुरू करण्यात आली असून त्याअंतर्गत विद्यार्थ्यांना आर्थिक मदतीचा हात दिला जाणार आहे.
नगर जिल्ह्यामधील नगर, पारनेर, संगमनेर, अकोले व श्रीरामपूर येथे मुले व मुली आणि राहुरी येथे फक्त मुलांच्या सरकारी वसतिगृहात २०१८-२०१९ शैक्षणिक वर्षात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयंम योजना २७ नोव्हेंबर २०१८च्य़ा सरकारी निर्णयानुसार व त्यातील अटी व शर्तींच्या अधिन राहून राबवली जाणार आहे. २०१६-२०१७पासून ही योजना कार्यान्वित आहे.
परंतु २०१६-२०१७मध्ये ज्या विद्यार्थ्यांना सरकारी वसतिगृहात प्रवेश मिळाला नाही, अशा विद्यार्थ्यांना बारावीनंतरच्या उच्च शिक्षणासाठी भोजन, निवास व शैक्षणिक साहित्यासाठी त्यांच्या आधारसंलग्न बँक खात्यामध्ये थेट रक्कम वितरीत करण्यात येणार आहे. त्यासाठीची पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयंम योजना १५ ऑक्टोबर २०१६च्या सरकारी निर्णयानुसार सुरू करण्यात आली आहे. या योजनेच्या अधिक माहितीसाठी गृहपाल, आदिवासी मुला-मुलींचे सरकारी वसतिगृह येथे संपर्क साधण्याचे आवाहन एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे (राजूर) प्रकल्प अधिकारी संतोष ठुबे यांनी केले आहे.
Website Title: Latest News Akole: Pandit Deendayal Upadhyaya Swam Yojna; Scheduled students will get money in the bank