तरुणीला फूस लावून पळवून नेले, सक्तीने धर्मांतर केल्याचा आरोप
Breaking News | Ahmednagar: एका तरुणीला फूस लावून पळवून नेऊन सक्तीने धर्मांतर घडवून विवाह लावल्याचा आरोप गाव बंद : मढी ग्रामस्थांचा पाथर्डी पोलिस ठाण्यावर मोर्चा.
तिसगाव : मढी (ता. पाथर्डी) येथील एका तरुणीला फूस लावून पळवून नेऊन सक्तीने धर्मांतर घडवून विवाह लावल्याचा आरोप करत ग्रामस्थ, विविध संघटनांनी पाथर्डी पोलिस ठाण्यावर बुधवारी (दि.६) सकाळी मोर्चा नेला. संबंधितांवर कठोर कारवाई करावी, यासह विविध मागण्यांचे निवेदन पोलिसांना दिले. याप्रकरणी सकाळी ग्रामस्थांनी ग्रामसभा घेत कठोर कारवाईची मागणी केली. दिवसभर कडकडीत बंद पाळला.
प्रेम प्रकरणातून मढी येथील एक तरुण आणि तरुणी शुक्रवारी (दि.१) पळून गेले होते. रविवारी (दि.३) ते दोघे पाथर्डी पोलिस ठाण्यात आल्याचे मुलीचे कुटुंबीय, नातेवाईक मढी येथील ग्रामस्थांना समजले. त्यांनी पोलिस ठाणे गाठले. ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेतला, त्या तरुणाने मुलीला प्रेम प्रकरणातून फूस लावून पळून नेले. तिचे धर्मांतर केले. तिचे नाव बदलून विवाह केला, असे मुलीचे नातेवाईक व ग्रामस्थांचे म्हणणे आहे. यावेळी कुटुंबीयांनी मुलीशी चर्चा केली. मात्र, ती ऐकण्याच्या मनःस्थितीत नसल्याने पोलिसांनी तिची रवानगी महिला सुधारगृहात केली. दुसरा प्रकार शनिवारी (दि. २) रात्रीही घडला आहे. मात्र, ग्रामस्थांनी नगरजवळील चांदबीबी महालाच्या परिसरातून ती मुलगी परत आणली होती, असे ग्रामस्थांनी पोलिसांच्या निदर्शनास आणून दिले.
या घटनेची सखोल चौकशीची ग्रामस्थांनी मागणी केली. उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील पाटील, पोलिस निरीक्षक संतोष मुटकुळे यांनी ग्रामस्थांबरोबर चर्चा केली. यावेळी सरपंच संजय मरकड, माजी सरपंच भगवान मरकड, देविदास मरकड, सुभाष मरकड, दीपक महाराज काळे, पप्पू पालवे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.
Web Title: Kidnapped young woman, accused of forced conversion
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study