Murder: मुलीला सासरी न पाठवल्याचा रागातून जावयाने केली सासऱ्याची हत्या
Akola Crime | अकोला: रागामुळे अनेकांचे आयुष्य उधवस्त झाल्याची एक घटना समोर आली आहे. मुलीला सासरी न पाठवल्याचा रागातून जावयाने आपल्या सासऱ्याची धारदार शस्त्राने हत्या (Murder) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अकोल्यातील तेल्हारा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या ग्राम पाथर्डी येथे घडली आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, पाथर्डी येथील मयत गजानन पवार यांच्या मुलीचा विवाह काही वर्षांपूर्वी झाला होता. गेल्या चार महिन्यापासून मुलगी माहेरी पाथर्डी येथे आली होती.
२३ एप्रिल दिवशी आरोपी जावई निलेश विठ्ठल धुरंदर रा. उमरी ता तेल्हारा हा आपल्या पत्नीला सासरी पाथर्डी येथे घेऊन जायला आला होता. मात्र, ‘वडील घरी नाहीत त्यांना येउ द्या नंतर बघू’ असे म्हटले. दरम्यान काही वेळाने मुलीचे वडील हे घरी आले. सासरा आणि जावई या दोघांमध्ये मुलीला सासरी पाठवण्याच्या कारणातून वाद निर्माण झाले. रागाच्या भरात जावई तेथून निघून गेला. त्यानंतर मध्यरात्रीच्या सुमारास अंगणामध्ये सासरे गजानन पवार हे घराच्या अंगणामध्ये खाटेवर झोपलेले असतांना आरोपी जावई तेथे आला. झोपलेल्या सासऱ्यावर झोपेतच मानेवर धारदार चाकुने वार करून रक्तबंबाळ केले आहे. जखमी गजानन पवार यांनी आरडा-ओरड केली असता मुलगी धावत बाहेर आली. असता तिचा पती हातामध्ये चाकू घेऊन उभा होता. यावेळी पुन्हा वार करणार तोच मुलीने आरोपी पतीला ढकलून आरडा- ओरड केली तेव्हा आरोपी तेथून फरार झाला आणि हे वृत्त गावभर पसरले मयत गजानन पवार यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र, दवाखान्यात जातानाच ते मयत झाले.
याप्रकरणी पोलिसांना माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल होऊन आरोपीचा शोध घेण्यासाठी वेगवेगळे पथक तयार करून जवळपास २ तासात शोध घेत आरोपीला अटक (Arrest) केली. याबाबत आरोपीच्या पत्नीने दिलेल्या फिर्यादीवरून तेल्हारा पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलीस करत आहेत. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
Web Title: Javaya Murder his father-in-law out of anger for not sending his daughter-in-law