Home अकोले इंदोरीकर महाराज, जरा सबुरीनेच घ्या.

इंदोरीकर महाराज, जरा सबुरीनेच घ्या.

लोकांनी संत तुकाराम, ज्ञानेश्वर महाराज यांना सोडले नाहीतर तेव्हा तुमची काय बिशाद महाराज… किर्तनाच्या माध्यामातून समाज प्रबोधन होत असेल तर त्याला आमचा जाहीर पाठिंबाच आहे. तमाशात बसणारा युवक वर्ग कीर्तनात पुढे बसायला लागला त्यामुळेच आम्ही इंदुरीकर महाराज यांचे सोबत असा ट्रेंड सोशल मीडियावर फिरत आहे.

            सर्व वयोगटातील श्रोत्यांमध्ये किर्तन हा विषय घेऊन जाण्यात निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर यशस्वी झाले. समाजातील पूर्वापार चालत आलेल्या परंपरा आणि वस्तुस्थितीवर हसतखेळत टीका करत असताना जमलेल्या लोकांना चार बोल सुनावण्याचे धाडसही त्यांच्या किर्तनात पहायला मिळते.

       एक म्हण आहे “हा महाराष्ट्र कधी किर्तनाने सुधारला नाही,अन तमाशाने बिघडला नाही” ही म्हण इंदुरीकर यांनी खोटी ठरवली. त्यांनी त्यावेळी वरातीवर कीर्तनातून टीका करायला सुरुवात केली तरुण मुले वरातीत दारू पिऊन नाचायचे ती बिघडलेली पिढी सुधारविण्याचे काम त्यांनी केले अन ते समाजप्रबोधन कार बनले

  अहमदनगरच्या अकोले तालुक्यात असणाऱ्या इंदोरी गावात काशिनाथ देशमुखांच्या घरी निवृत्ती महाराजांचा जन्म झाला. आईवडील दोघेही वारकरी सांप्रदायाचे असल्याने लहानपणापासुनच भजन, किर्तन, हरिपाठ, सप्ताह अशा गोष्टींचा त्यांच्यावर प्रभाव पडला. त्यामुळे वाचन आणि प्रवचन यात त्यांची प्रगती सुरु झाली. ज्ञानाची खोली वाढत गेली. या वातावरणातच त्यांनी बी एससी. बी एड शिक्षण पूर्ण केले. शिक्षण घेतल्यानंतर वयाच्या २३ व्या वर्षी  निवृत्ती महाराजांना शिक्षकाची नोकरी मिळाली. शिक्षकी नोकरी नंतरच्या उरलेल्या सायंकाळच्या वेळात निवृत्ती महाराज सायकलवर फिरुन आजूबाजूच्या खेड्यात जाऊन प्रवचन, किर्तन करायला लागले. त्यांची किर्तनामधील विनोदी शैली लोकांना आवडू लागली. लोक त्यांच्या किर्तनाला गर्दी करु लागले. निवृत्ती महाराज आपल्या किर्तनातून लोकांना खळखळून हसवत होते. लोकांचा प्रतिसाद वाढत गेला.

     २००० साली तालुक्यातील कळस बु गावात झालेले त्यांचे एक किर्तन रेकॉर्ड केले गेले. त्याच्या कॅसेट बनवण्यात आल्या. हातोहात दोन हजार कॅसेट विकल्या गेल्या. पुढे सीडी निघाल्या. कीर्तनाच्या ठिकाणी त्याही विकल्या गेल्या.नगर जिल्ह्यात निवृत्ती महाराजांच्या नावाची चर्चा सुरु झाली. इंदोरी गावावरुन लोक त्यांना इंदुरीकर महाराज म्हणुन ओळखू लागले. नगरच्या बाहेरही इंदुरीकर महाराज प्रसिद्ध व्हायला लागले. इंदुरीकर महाराज महाराष्ट्रभर प्रसिद्ध झाले. लोकप्रियता वाढत गेली. व्याख्यानांच्या तारखा मिळायला लागल्या. गावोगावच्या हरिनाम सप्ताहात इंदुरीकर महाराजांचे किर्तन ठेवण्यासाठी संपर्क करु लागले. पुढे पुढे तर महाराजांची तारीख मिळेनाशी झाली. महाराजांनी दिवसातून तीन-चार किर्तन करायला सुरुवात केली. राजकीय क्षेत्रामधील नेत्यांच्या वाढदिवसालाही महाराजांना तारीख मिळू लागली. इंदुरीकर महाराजांची लोकप्रियता एवढी वाढली की येरवडा जेलमधील कैद्यांसाठी त्यांचे किर्तन आयोजित केले गेले. अलीकडच्या काळात युट्युब, टिकटॉक या माध्यमातून तरुण वर्गातही इंदुरीकर महाराजांची लोकप्रिय बनलेत.

       किर्तनाच्या माध्यमातुन त्यांनी संपत्ती कमवली आहे.असा आरोप होतो मात्र त्यातुनच ते संगमनेरच्या ओझर बुद्रुक येथे खंडेराव पाटील खेमनर माध्यमिक विद्यालय नावाची शाळाही चालवतात. तिथेच शिक्षकाचे कामही करतात. या विना अनुदानित शाळेतील शिक्षकांचे पगार वेळेवर देतात. अनाथ आश्रम, गोपालन करतात

इंदुरीकर महाराज अनेक अनिष्ट सामाजिक प्रथांवर प्रहार करतात आणि ते जे बोलतात ते लोकांनाही पटते. आई वडील यांची सेवा करा, सासू सुनांचे संबंध,   पळून जाणाऱ्या मुले मुली यांच्या वरही आपल्या शैलीत प्रहार करतात मात्र स्त्री पुरुष समानतेच्या नावाखाली काही प्रसिद्धीसाठी हपापलेल्या महिलांनी एखादी घटना किती लांबवायची याच भान ठेवावे . महिला म्हणून आपल्याला कायद्याने जे जास्तीचे अधिकार दिलेत त्याचा दुरुपयोग करून कोणाचेही वैयक्तिक आयुष्य बदनाम करू नये.  समाजप्रबोधन करन्याची प्रत्येकाची विशिष्ट शैली असते, बोली भाषा बोलण्याची पद्धत असते. त्याचा मतितार्थ ध्यानात घ्यावा उगाच साप साप म्हणून भुई झोडपायची नसते .

इंदुरीकर महाराजांनी केलेले विधान योग्य नसले तरी ते आजपर्यंत शिकवलेल्या उपलब्ध असलेल्या धार्मिक ग्रंथ-पुरानांच्या माहितीच्या आधारे केलेलं आहे. आज महाराष्ट्रात सत्यवादी समाजप्रबोधनाचे धडे देणारे एकमेव व्यक्ती म्हणजे ती ह.भ.प. निवृत्ती महाराज इंदूरीकर आहेत.

       आम्ही इंदुरीकर महाराज यांचे सोबत आहोत असे मत कळस येथील हभप विष्णु महाराज वाकचौरे, देवराम महाराज वाकचौरे, गणेश महाराज वाकचौरे, अरुण महाराज वाकचौरे, सिताराम बुवा वाकचौरे, सूर्यकांत ढगे, भाऊसाहेब वाकचौरे, अमित वाकचौरे, दौलत वाकचौरे, रावसाहेब वाकचौरे, राजेंद्र गवांदे, सुरेश वाकचौरे, राम वाकचौरे, अशोक वाकचौरे, दशरथ वाकचौरे, दत्तात्रय ढगे, एकनाथ ढगे यांनी व्यक्त केले आहे.

Website Title: Indorikar Maharaj, take it with just a bit

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here