इंदोरीकर महाराजांना दोन वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा? अंनिस च्या पत्रकार परिषदेत काय म्हंटल?
Indorikar Maharaj: महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्यावतीने खबरदारी म्हणून सर्वोच्च न्यायालयात सावधानपत्र म्हणजेच ‘कॅव्हेट’ दाखल करण्यात येणार.
पुणे: प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज देशमुख उर्फ इंदोरीकर महाराजांनी लिंगनिदान दाव्यासंबंधी अशास्त्रीय व बेकायदेशीर वक्तव्य केल्याप्रकरणी त्यांच्यावरील खटला सुरू ठेवण्यासाठी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्यावतीने खबरदारी म्हणून सर्वोच्च न्यायालयात सावधानपत्र म्हणजेच ‘कॅव्हेट’ दाखल करण्यात येणार असल्याची माहिती समितीचे अध्यक्ष अविनाश पाटील यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.
इंदोरीकर महाराज यांनी केलेल्या वक्तव्यांसदर्भात त्यांच्यावर संगमनेर (Sangamner) येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयातील खटला सुरू ठेवण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर) खंडपीठाने 16 जून रोजी देताना खटला रद्द करण्याचा जिल्हा न्यायालयाचा आदेश रद्द ठरविला आहे.
तसेच, इंदोरीकर महाराज यांना त्यांच्या मागणीनुसार पुढील अपील करण्यासाठी उच्च न्यायालयाने चार आठवड्यांची मुदत दिलेली आहे. त्यामुळे या काळात ते औरंगाबाद खंडपीठाचे न्यायाधीश किशोर संत यांच्या निकालाला आव्हान देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात जाण्याची शक्यता आहे. त्याअगोदरच सर्वोच्च न्यायालयात महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या (महा. अंनिस) वतीने खबरदारी म्हणून सावधानपत्र (कॅव्हेट) दाखल करण्यात येणार आहे.
इंदुरीकर महाराज यांची सततची महिलंसंबंधी अपमानजनक वक्तव्य आणि गर्भलिंग निदानासंबंधीचा दावा हा स्त्रियांना दुय्यमत्व देणारा, पुरुषी व्यवस्थेला समर्थन देणारा असल्यामुळे यासंबंधीचा खटला सुरू ठेवण्याचा न्यायालयाचा आदेश हा महाराष्ट्रातील स्त्री भ्रूणहत्येला पोषक स्वरूपाचे वर्तन व्यवहार करणार्या सर्वच प्रकारच्या संबंधितांना चपराक देणारा आहे. त्या अर्थाने तो स्त्रियांच्या जन्माच्या अधिकाराला विश्वास आणि स्वातंत्र्य देणारा आदेश आहे, असे पाटील यांनी सांगितले. इंदुरीकर यांच्यावर गर्भधारणापूर्व आणि प्रसूतीपूर्व गर्भलिंग निदान प्रतिबंधक (पीसीपीएनडीटी) कायद्यानुसार कारवाई होऊन त्यांना दोन वर्षे सश्रम करावासाची शिक्षा देण्यात यावी, अशी मागणीही पाटील यांनी केली.
Web Title: Indorikar Maharaj sentenced to two years of rigorous imprisonment? What did Annis say
See also: Latest Marathi News, Ahmednagar News, Education Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App