अहिल्यानगर: पतीची चाकूने छातीवर वार करत आत्महत्या; पत्नीने घेतली इमारतीवरून उडी
Breaking News | Ahilyanagar: पती-पत्नीत झालेल्या वादातून पतीने स्वतःच्या छातीवर चाकूने वार करत आत्महत्या केली तर पतीच्या आत्महत्येनंतर पत्नीने देखील इमारतीच्या पहिल्या मजल्यावरून उडी मारत आत्महत्येचा प्रयत्न.
अहिल्यानगर: पती-पत्नीत झालेल्या वादातून पतीने स्वतःच्या छातीवर चाकूने वार करत आत्महत्या केली तर पतीच्या आत्महत्येनंतर पत्नीने देखील इमारतीच्या पहिल्या मजल्यावरून उडी मारत आत्महत्येचा प्रयत्न केला. यात ती गंभीर जखमी झाली आहे. ही घटना नगर एमआयडीसी जवळील गजानन कॉलनी येथे वडगाव गुप्ता रोडवर १७जुलै रोजी रात्री १०.३० च्या सुमारास घडली.
मूळचा उत्तर प्रदेशचा आणि सध्या गजानन कॉलनी येथे वास्तव्यास असलेला अनिल ध्रुव खरवाल (वय २६) असे मयत तरुणाचे नाव आहे. तर त्याची पत्नी किरण अनिल खरवाल ही जखमी झालेली असून तिच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या पती पत्नीमध्ये कौटूंबिक वाद झाला, त्यामुळे रागाच्या भरात अनिल याने स्वतः त्याच्या छातीवर चाकू मारून घेतला. त्यामुळे घटनास्थळी रक्ताचा थारोळा पाहून, त्यांच्या पत्नीने घाबरुन गाडी बोलवा, गाडी बोलवा दवाखान्यात न्या असा आरडा ओरडा केला.
त्यानंतर तिने इमारतीच्या पहिल्या मजल्यावरून उडी मारली. त्यात ती जमिनीवर पडून जखमी झाली. हा आरडाओरडा ऐकून शेजारील नागरिकांनी तेथे धाव घेतली असता अनिल रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसला तर त्याची पत्नीही घराबाहेर पडलेली दिसली. काही नागरिकांनी तातडीने रुग्णवाहिका बोलवून दोघांना उपचारांसाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल नेले. तेथील डॉक्टरांनी अनिल खरवाल याला तपासून तो औषधोपचारापूर्वी मयत झाला असल्याचे घोषित केले.
या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात जिल्हा शासकीय रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. कुलकर्णी यांच्या अहवालावरुन आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तर किरण खरवाल हिचेवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. पती-पत्नीमध्ये नेमका कशावरून वाद झाला? याबाबत अद्याप स्पष्टता नाही. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.
Breaking News: Husband commits suicide by stabbing himself in the chest