अहिल्यानगर: बनावट 500 रूपयांच्या नोटांचे मोठे रॅकेट उघडकीस; सात जेरबंद
Breaking News | Ahilyanagar Crime: हुबेहूब 500 रूपयांच्या भारतीय चलनी नोटांसारख्या बनावट नोटा छापणार्या एका मोठ्या रॅकेटचा अहिल्यानगर तालुका पोलिसांनी पर्दाफाश.
अहिल्यानगर: हुबेहूब 500 रूपयांच्या भारतीय चलनी नोटांसारख्या बनावट नोटा छापणार्या एका मोठ्या रॅकेटचा अहिल्यानगर तालुका पोलिसांनी पर्दाफाश केला असून, या प्रकरणात सुरूवातीला दोघांना अटक करण्यात आली होती. यात आणखी पाच जणांना अटक केली आहे. या संशयित आरोपींकडून 59 लाख 50 हजार रूपयांच्या बनावट नोटा, 2 कोटी 16 लाख रूपये किंमतीचे कच्चा माल आणि अत्याधुनिक छपाई साहित्य असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कालुबर्मे, पोलीस उपअधीक्षक अमोल भारती आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रल्हाद गिते उपस्थित होते. 27 जुलै रोजी रात्री सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रल्हाद गिते यांना माहिती मिळाली की, दोन इसम काळ्या रंगाच्या वाहनातून आंबीलवाडी परिसरात फिरत आहेत आणि 500 रूपयांच्या बनावट नोटा वापरून सिगारेट खरेदी करत आहेत. पोलिसांनी सापळा रचून निखील शिवाजी गांगर्डे (वय 27, रा. कोंभळी, ता. कर्जत) आणि सोमनाथ माणिक शिंदे (वय 25, रा. तपोवन रस्ता, अहिल्यानगर) या दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्या वाहनातून 80 हजार रूपये किंमतीच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या.
पुढील तपासात बीड आणि छत्रपती संभाजीनगर येथून आणखी संशयित आरोपींचा पर्दाफाश झाला. पोलिसांनी प्रदीप संजय कापरे (वय 28, रा. तिंतरवणी, ता. शिरूर कासार, जि. बीड), मंगेश पंढरी शिरसाठ (वय 40, रा. शिवाजीनगर, छत्रपती संभाजीनगर), विनोद दामोधर अरबट (वय 53, रा. सातारा परिसर, छत्रपती संभाजीनगर), आकाश प्रकाश बनसोडे (वय 27, रा. निर्सग कॉलनी, पेठेनगर, छत्रपती संभाजीनगर) आणि अनिल सुधाकर पवार (वय 34, रा. मुकुंदनगर, छत्रपती संभाजीनगर) यांना अटक केली. या रॅकेटचा मुख्य सूत्रधार अंबादास रामभाऊ ससाणे (रा. शहर टाकळी, ता. शेवगाव) अद्याप पसार असून त्याचा शोध सुरू आहे.
Breaking News: Huge racket of fake Rs 500 notes exposed