हॉटेल बुकींग एजंटची लॉडविक पॉइंटवर आत्महत्या, साडेपाचशे फूट दरीतून बाहेर काढला मृतदेह
Satara Suicide Case: महाबळेश्वरच्या लॉडविक पॉइंटवर एकाने आत्महत्या केल्याची घटना.
सातारा : महाराष्ट्राचं ‘मिनी काश्मीर’ म्हणजेच महाबळेश्वरच्या लॉडविक पॉइंटवर एकाने आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी सायंकाळी साडेचारच्या सुमारास घडली. संजय वेलजी रुघानी (वय ५२, मूळ रा. शांतीनगर, मीरा रोड, मुंबई, सध्या रा. पाचगणी), असं मृताचं नाव आहे. महाबळेश्वर आणि पाचगणीत ते हॉटेल बुकींग एजंट म्हणून काम करत होते. त्यांच्या आत्महत्येचं नेमकं कारण समोर आलं नसल्याची माहिती पेलिसांनी दिली.
महाबळेश्वरात सध्या नाताळची जोरदार तयारी सुरू आहे. नाताळ सुट्टीच्या निमित्ताने महाबळेश्वर पाचगणीतील हॉटेल्सचं बुकींग फुल्ल झालं आहे. अशातच हॉटेल बुकींग एजंट संजय रुघानी यांनी आत्महत्या केल्यानं खळबळ उडाली आहे. त्यांचे दोन्ही मोबाईल घटनास्थळी सापडले आहेत. ते हॉटेल बुकिंग एजंट असल्यानं महाबळेश्वर आणि पाचगणीमधील अनेक हॉटेल्सवर त्यांचं येणं जाणं होतं, अशी माहिती समोर आली आहे.
लॉडविक पॉईंटवर गुरुवारी सायंकाळी साडेचारच्या सुमारास एक परदेशी पर्यटक पर्यटनाचा आनंद घेत होता, तर एक नवदाम्पत्य मोबाईलमधून व्हिडिओ चित्रिकरण करत होते. आपल्या जवळपास कोणी नसल्याचं पाहून संजय रुघानी यांनी आत्महत्या केली. त्यानंतर या पर्यटकांनी लॉडविक पॉईंटवरील व्यावसायिकांना घटनेची माहिती दिली. व्यावसायिकांनी पोलीस आणि ट्रेकर्सना कळवलं.
घटनेची माहिती मिळताच महाबळेश्वर ट्रेकर्स आणि प्रतापगड सर्च अँड रेस्क्यू टीमचे सदस्य घटनास्थळी दाखल झाले. साडेपाचशे फूट खोल दरीत उतरून रात्री उशिरा त्यांनी मृतदेह दरीतून वर काढला.
Web Title: Hotel booking agent commits suicide at Lodwick Point
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study