राज्यातील ‘या’ जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा, शाळांना सुट्टी जाहीर
Breaking News | Maharashtra Rain Alert: महाराष्ट्रात इतरत्रही मुसळधार पावसाचा इशारा.
रायगड: जिल्ह्याला हवामान विभागाने आज ऑरेंज अलर्ट जारी केला असून, दोन नद्या इशारा पातळीवर गेल्याने प्रशासन सतर्क झालं आहे. परिणामी जिल्ह्यातील काही तालुक्यांतील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
कुंडलिका आणि पाताळगंगा नद्या इशारा पातळी पार :
रोहा तालुक्यातील कुंडलिका नदी आणि खालापूरमधील पाताळगंगा नदी यांनी इशारा पातळी ओलांडली आहे. नागोठणे येथील आंबा नदी देखील धोक्याच्या जवळ पोहोचली आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा तातडीने अलर्ट मोडवर आणल्या आहेत.
जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, रायगड जिल्ह्यातील अलिबाग, महाड, रोहा, पोलादपूर, तळा आदी तालुक्यांतील सर्व शाळा व महाविद्यालये बंद ठेवण्यात आली आहेत. दरम्यान, किनारपट्टी भागातील मच्छीमार व नागरिकांना बाहेर न पडण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
वाहतूक विस्कळीत – रस्ते आणि पूल पाण्याखाली :
पाली-खोपोली रोड बंद: अंबा नदीच्या पाणीपातळीत वाढ झाल्याने, पाली पोलिस ठाणे हद्दीतील पाली-खोपोली रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.
खुरावले फाटा रस्ता ठप्प: सुधागड तालुक्यातील भेराव गावाजवळील रस्ता पूल पाण्याखाली गेला आहे. दरम्यान, पुलांवरून पाणी वाहत असल्याने पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
खेड तालुक्यातही पूरस्थिती, जगबुडी नदीचा धोका :
रत्नागिरीच्या खेड तालुक्यातील घाटमाथ्यावरही जोरदार पावसामुळे जगबुडी नदीने इशारा पातळी पार केली आहे. मटण मार्केट परिसरात नदीचं पाणी शिरल्यानं स्थानिकांमध्ये घबराट पसरली आहे. खेड नगरपरिषदेकडून सतर्कतेच्या सूचना जारी करण्यात आल्या आहेत.
Maharashtra Rain Alert | महाराष्ट्रात इतरत्रही मुसळधार पावसाचा इशारा :
पश्चिम महाराष्ट्र: पुणे, सातारा, कोल्हापूर, नाशिक येथे जोरदार पावसाची शक्यता
उत्तर महाराष्ट्र: नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार जिल्ह्यांत वादळी वारे आणि पाऊस
मराठवाडा: बीड, लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली आणि छत्रपती संभाजीनगर येथे मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज
विदर्भ: अकोला, अमरावती, नागपूर, गोंदिया, भंडारा, वर्धा, यवतमाळ, वाशिम जिल्ह्यांतही वादळी पावसाचा इशारा.
Breaking News: Heavy rain warning in ‘Ya’ district, holiday declared for schools