Rain | भंडारदरा पाणलोटक्षेत्रात जोरदार पाउस
Rain | भंडारदरा: भंडारदरा पाणलोटक्षेत्रात क्षेत्रात मान्सून सक्रिय झाला असून गुरुवारी सायंकाळी साडे सात वाजता जोरदार पाउस सुरु होता. त्यामुळे आज धरणात पाण्याची आवक वाढणार आहे.
पाणलोटात रविवारपासून मान्सून सरी सुरु झाल्या. अधून मधून सरी कोसळत आहे. पावसाने फारसा जोर पकडला नव्हता. काल सायंकाळी 5 वाजेपासून पावसास सुरूवात झाली. त्यानंतर अधूनमधून सरी कोसळत होत्या. रात्री 7.30 वाजण्याच्या सुमारास पावसाने जोर पकडला. पाऊण तास जोरदार सरी कोसळत होत्या. नंतर काही काळ पावसाची रिपरिप सुरू होती. रात्री पावणे दहा नंतर पुन्हा पावसाने जोर पकडला होता. त्यामुळे डोंगरदर्यातून धबधबे जोमाने वाहू लागले आहेत. ओढेनाले खळखळू लागले असून धरणात विसावू लागले आहेत.
काल सकाळी संपलेल्या 24 तासांत भंडारदरा 7, घाटघर 19, पांजरे 9, रतनवाडी 8 तर वाकी 4 मिमी पावसाची नोंद झाली आहे. मुळा पाणलोटक्षेत्रातही पावसाने जोरदार सलामी दिल्यानंतर काल दुपारी काही काळ सरी कोसळल्या होत्या. अकोले शहर व तालुक्यात बहुतांश ठिकाणी पावसाने हजेरी लावल्याने नागरिकांना दिलासा मिळाला असून समाधान व्यक्त होत आहे.
Web Title: Heavy rain in Bhandardara catchment area